जंगल सफारी चे वेड असल्यामुळे अन् अभयारण्य क्षेत्रात जन्म झाल्यामुळे नकळतपणे मी प्रकृतीशी एकरूप झालो. मिळेल तो वेळ मी जंगल -डोंगर- दर्या तील भटकंतीसाठी वापरायचो. माझ्या या फिरण्यामुळेच मला नातेवाईक व मित्रमंडळी सहज भटक्या म्हणून संबोधायचे. आज हिच ओळख मला माझ्या या छंदामुळे मिळाली आहे. सह्याद्री पर्वत रांगेत अकोले तालुक्याचा बराचसा भाग येतो. या भागात प्रत्येक डोंगरावर ऐतिहासिक पाऊलखुना आहेत. कोठे कातळात कोरीव पायऱ्या तर कोठे कोरीव पाणी टाकी. मात्र यातील काहींनाच दुर्ग म्हणून ओळख मिळाली आहे. हा प्रत्येक डोंगरी किल्ला नेहाळताना अनेक अनुभव आले. हे सर्व डोंगरी किल्ले फिरून झाल्यावर महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातील अनेक प्राकृतिक ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणांची भटकंती झाली. याबरोबरच तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओरिसा, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, गुजरात मध्यप्रदेश या राज्यांतीलही काही पर्यटन स्थळांची भटकंती झाली. मात्र या सर्वांमध्ये अंदमान -निकोबार व तेथील जारवा बेटावरचा झालेला प्रवास विलक्षण होता. आता हा संपूर्ण प्रवास भटक्याच्या रूपाने पुन्हा एकदा आपल्यासोबत अनुभवायास मिळणार आहे.
श्री. अरविंद सुभाष सगभोर ( M.A.History )
मी अरविंद सुभाष सगभोर अर्थात भटक्या. माझे बारावीपर्यंतचे शिक्षण सह्याद्रीच्या कुशीतच झाले. त्यानंतर कोल्हापूरला डी.एड., पुढे साताऱ्यात पदवी आणि पुणे विद्यापीठातून पद्युत्तर शिक्षण इतिहास विषयातून पूर्ण केले. प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना, अनेक प्रवास वर्णन, व्यक्ती चरित्रे यांचे वाचन झाले. कृष्णमेघ कुंटे यांचे एका रानवेडयाची शोधयात्रा या पुस्तकापासून प्रेरित होऊन भटकंतीचे वेड अधिकच वाढले. त्यातून लेखनाचा छंदही वृद्धिंगत झाला. भटकंती करताना येणाऱ्या अडचणी, त्यासाठीची करावयाची आवश्यक तयारी, तेथील अनुभवायच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी या सगळ्या आपल्याला उपलब्ध व्हाव्यात व आपली भटकंती सुरक्षित व सुखकर व्हावी आणि मलाही त्यानिमित्ताने अभिव्यक्त होता यावं यासाठीच भटक्याच्या माध्यमातून Blog & Vlog सुरू करत आहे. नक्कीच आपल्याला याचा उपयोग होईल हीच इच्छा.
अपेक्षा.