पश्चिम घाट माथ्यावरील उत्तुंग सह्याद्रीच्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड डोंगररांगेतील अलंग- मदन- कुलंग सारखे अति अवघड किल्ले नैसर्गिक चमत्कारांनी युक्त सांदन दरी व भंडारदरा धरणाचा विशाल जलाशय यामध्ये प्राचीन स्थापत्याची साक्ष देत विसावलेले अमृतेश्वराचे मंदिर. अद्भुत. अवर्णनीय.
अकोले राजूर मार्गे भंडारदरा येथे पोहोचल्यावर, भंडारदारा पासून १५ किमी अंतरावर रतनवाडी या गावी हे पुरातन मंदिर आपल्या स्थापत्याची साक्ष देत उभे आहे. रतनवाडी गावात पोहोचल्यावर दुरूनच मंदिराचे कोरीव व देखणे काम, मंदिराची दगडी रचना आपले मन व लक्ष वेधून घेते. मंदिराची रचना त्याच्या सुंदरतेची कल्पना देते. नंदी मंडप, गर्भगृह व सभामंडप गर्भगृहावर आकर्षक शिखर. असे सुंदर रचना असलेले हे मंदिर, पूर्व -पश्चिम दिशेला आहे. दोन्ही दिशेला प्रवेश द्वार असलेल्या या मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळकडा आहे. त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले चौरसाकृती खांब आहेत. खांबांच्या वरचा भाग अष्टकोनी असून, त्यावर वर्तुळाकृती आहेत. मंदिराच्या शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली सोडलेल्या आहेत. मंदिराच्या या वैशिष्ट्यपूर्ण रचनेत पूर्व व पश्चिम दोन्ही दिशेला मंडपाची रचना दिसून येते. पूर्वेकडून प्रथम नंदी मंडप, नंदी मंडपातून गर्भगृह, या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. गर्भगृहात तून पाठीमागे पश्चिमेला सभामंडप, यात कोरीवकाम दिसून येते. मंदिराचे नक्षीदार खांब, दगडातील कोरीव प्रवेशद्वार, भिंतीवरील मूर्तिकाम हे सारे अचंबित करणारे आहे. देव-दानव हे सर्व या ठिकाणी दगडावर अवतरलेले आहेत. मैथुन शिल्पे ही कोरीवकामात दिसून येतात. बाह्य भिंतीवरील भौमितिक रचना लक्ष वेधून घेतात. मंदिरात प्रकाश व वायू योजनेसाठी जाळीदार कोरीवकामही दिसणे येते. सर्व काही आश्चर्यचकित करणारे. जणू काही आपण एखाद्या लेण्यांमधील कोरीव काम बघत आहोत. कळसावरील बारीक कोरीवकाम बघताना नजर स्थिर होऊन जाते. या कोरीव कमी कडे बघतच रहावेसे वाटते. प्राचीन काळातील या सर्व कला किती संपन्न असतील याचा अंदाज आपण घेऊच शकत नाही. किती श्रीमंती ही! मंदिराबाहेर मोकळा परिसर आहे. परिसराला दगडी कठडा आहे. सर्व काही अगदी प्रशस्त.
अमृतेश्वराचे दर्शन घेत आणि प्राचीन स्थापत्य न्याहाळत आपण दक्षिणेकडे रतनवाडी गावच्या दिशेने वळावे. येथे झाडांमध्ये मोठे जलकुंड आढळते. त्यास पुष्करणी म्हणतात. मंदिरा ईतकेच भव्य. मोडकळीस आलेली हीजलवास्तू आजही तितकीच आकर्षक आणि सुंदर दिसते. आपण ही कला न्याहाळत असताना, त्यात कधी एकरूप होतो लक्षातही येत नाही. साधारणतः वीस-पंचवीस फूट लांब व रुंद असलेली ही पुष्करणी अतिशय देखणी आहे. या पुष्करणीत खाली उतरण्यासाठी पायर्यांची योजना केलेली आहे. भव्य आकाराच्या या पुष्करणीत १७ देव कोष्टकांची रचना केलेली दिसून येते. या बाराही कोष्टकांवर सुंदर शिखरांची रचना केलेली आहे. कोष्ककांमधील एकात गणपतीची मूर्ती आहे. सौंदर्य आणि पावित्र्य यांचा संगम असलेला मंदिराच्या शेजारचा हा दुसरा प्राचीन वास्तूप्रकार.
अतिशय भरीव आणि सुंदर नक्षीकाम असलेल्या या पुष्करनीतील जलसाठाही तितकाच सुंदर वाटतो. प्रकृतीच्या कुशीत कोरलेले हे नक्षीकाम प्राचीन श्रीमंतीची साक्ष देते. निसर्गसंपन्न परिसरातील हे प्राचीन मंदिर आणि त्याशेजारी असलेली ही देखणी पुष्करणी मन मोहित करून टाकते.
मंदिराचा उल्लेख अनेक ठिकाणी हेमाडपंथी म्हणून केलेला आढळतो. मंदिराच्या बांधकामावरून तसे दिसूनही येते. कारण घडीव दगडातील हे संपूर्ण बांधकाम, दगडी आकार एकमेकात गुंफून ही वास्तू उभी केलेली आहे. त्यामुळे ते हेमाडपंती स्थापत्यशैलीशी मिळते-जुळते, मात्र इतर शैलींचाही यावर प्रभाव दिसून येतो. मंदिराच्या कळसाची रचना व नक्षीकाम यावरून प्रथमदर्शनी हे नागर शैली बांधकाम दिसून येते. मात्र मंदिराच्या सभोवतालची मोठी जागा, नंदीमंडप आणि पुष्करणी द्राविड स्थापत्य शैलीत आढळून येतात. स्थापत्यशैली प्रकार कोणतीही असो. मात्र प्राचीन स्थापत्य शैलीचे हे उत्कृष्ट उदाहरण आपल्या परिसरात असल्याचे निश्चितच अभिमानास्पद आहे.
प्राकृतिक सौंदर्य व पराक्रमी इतिहासाची साक्ष लाभलेल्या या परिसरातील ही प्राचीन कला निश्चितच परिसराला परिपूर्ण करते. या ठिकाणी मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जाते. आज पर्यटकांसाठी हा भाग महत्वाचे केंद्रबिंदू बनत आहे. या परिसरात सर्व प्रकारच्या पर्यटनाची इच्छा पूर्ण होते. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची खोल सांदण दरी येथून दहा मिनिटाच्या अंतरावर आहे. आदिवासी पराक्रमाची साक्ष देणारा डोंगरी किल्ला रतनगड, हा येथूनच रान वाटेने चढावा लागतो. अमृतेश्वराकडे येता वेळेस दोन मार्ग आहेत. हे दोन्ही मार्ग ब्रिटिश काळात बांधलेल्या आणि अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण जलाशयाच्या कडेकडेने येथपर्यंत आपल्याला घेऊन येतात.
दहाव्या शतकात शिलाहार वंशातील राजा झांज याने भीमा नदी ते गोदावरी नदी या दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थानी बारा शिवालये बांधली. त्यापैकी हे एक. असा ऐतिहासिक उल्लेख आढळतो. मंदिराची प्राचीन स्थापत्य शैली जतन करण्याच्या हेतूने ४ मार्च इ.स. १९०९ साली या प्राचीन मंदिराला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. अमृतेश्वर मंदिर हा प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहासाची साक्ष देणारा परिसर. नैसर्गिक खोल सांदण दरीच नव्हे, तर महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कळसुबाई. अशा प्राकृतिक सौंदर्याने नटलेला असा हा परिसर. येथे नक्कीच आपल्याला प्राकृतिक व प्राचीन काळाची श्रीमंती अनुभवतानाच आपण नकळत पर्यटनाची श्रीमंतीही येथे अनुभवतो.
लेखन : श्री. अरविंद सुभाष सगभोर ( M.A.History )
संपर्क : 7218663377
ई-मेल : arvind@bhatkya.in