पट्टा रांगेतील टेहळणीसाठीचा किल्ला. अकोले-उंचखडक- पाभुळवंडी-देवगाव मार्गे जवळपास ५० किमीचा प्रवास केल्यावर आपण बितनवाडी येथे पोहचतो. येथुन पुढेही वाहन जाण्यासाठी मार्ग आहे. गडाच्या दिशेने जेवढं पुढे जाणे शक्य आहे तेवढा वेळ वाहनाने प्रवास केल्यावर गडवाटेने गडाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात होते. बितनगडाच्या उंचीबाबत अनेक उल्लेख आढळतात. गडाच्या पायथ्याजवळून गड चढायला सुरुवात केल्यावर निसरडी, अरुंद व वेडीवाकडी वळणे घेणारी गडवाट आहे. गडवाटेने सुरक्षित चढता येण्यासाठी पायऱ्यांसारख्या दगडांची मांडणी व खाचा केलेल्या आहेत. गडवाटेने चालत गेल्यावर पुढे कातळात कोरलेल्या अरुंद पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढणीला सुरुवात करण्या अगोदर उजवीकडे पायवाटेने थोडे अंतर गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. अतिशय अरुंद तोंडाचे कातळात कोरलेले साधारणत: ८-१० फूट डोगराच्या आत असलेले हे कोरीव पाणी टाके पहावयाचे असल्यास बसत आतमध्ये जावे लागते. आत गेल्यावर आतील बाजूला हे टाके गोलाकार विहीरीप्रमाणे आहे. ५-६ फूट खोल असलेले हे टाके म्हणजे उन्हाळ्यातही थंडगार पाण्याची सोय होय. यावेळी मात्र हे टाके स्वच्छतेच्या प्रतिक्षेत आहे. पाहून पुन्हा माघारी येत या कातळात कोरलेल्या पायऱ्यांनी चढणीला सुरुवात करावी. अरुंद असलेल्या या पायऱ्या चढण्यासाठी खोबणी यांची योजना केलेली आहे. मात्र आता या ठिकाणी पायऱ्यांना संरक्षणाच्या दृष्टीने रेलिंग केलेले आहे. गडावर जाण्यासाठीचा हा टप्पा अवघड व महत्वाचा आहे, उंच उंच आणि अरुंद आकाशाच्या दिशेने वरती जाणाऱ्या तीव्र उताराच्या कातळकड्यात कोरलेल्या पायऱ्या व डोक्यावर डोकावणारा व भेगा असलेला कडा यामुळे गड चढताना दमछाक होते. मात्र यावेळी वनपर्यटन विभागाची लोखंडी रेलिंग आधार देते. कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून समोरच दोन खांब असलेली कोरीव गुहा दिसते. या गडावरील एकमेव गुहा डोक्यापेक्षा थोडी जास्त उंच असलेली व संपूर्ण कातळात कोरलेली ही गुहा रुंदीपेक्षा डोंगरामध्ये जास्त खोलीची आहे." १२-१३ फूट रुंद असलेली ही गुहा डोंगरकड्यात १५ फूट खोल आहे. गुहेत भिंतीचे पाझरणारे पाणी बाजूने निघून जाण्यासाठी भिंतींच्या खालील बाजूसपाटासारखे केलेले कोरीवकाम उल्लेखनीय आहे. याठिकाणी पंधरा-वीस लोक राहु शकतात. गडावरील एकमेव गुहा बघत डावीकडून गडमाथ्याच्या दिशेने जावे याठिकाणी गडावरील पाणी पुरवठ्यासाठी दोन मोठे पाणी टाके कोरलेलीए आहेत. याच ठिकाणी वनपर्यटन विभागाने गडाच्या पूर्वेकडील कठड्यांना रेलिंग करुन पर्यटकांना निरिक्षणासाठी सुरक्षित व्यवस्था केलेली आहे. गडावरील या पाणी टाक्यांना डागडुगी केलेली दिसून येते. या टाक्यांच्या डावीकडून गडमाथ्यावर जाता येते.
गडमाथ्याच्या दिशेने पाहिल्यास येथे वनपर्यटन विभागाने उभारलेला पॅगोडा आपल्याला विश्रांतीसाठी खुणावतो. येथे थोडा आराम करत डावीकडून पुन्हा गडमाथ्याकडे निघावे. गडमाथ्यावर पोहोचल्यावर तेथे एक ध्वजस्तंभ व थोडेसे नजीकच्या काळातील बांधकाम केल्याचे दिसून येते, ज्या दिशेने माथ्यावर पोहचलो त्याच्या विरुध्द दिशेला थोडे खाली उतरल्यास तेथेही पाण्याचे टाके दिसून येते. ते टाके पाहून पुन्हा माघारी येत गड उतरणीला सुरुवात करावी. बितनगड उतरुन आल्यावर पूर्वेकडील वनपर्यटन विभागाच्या मनोऱ्याच्या वरच्या दिशेलाही कातळकड्यात कोरलेले एक लहान तोंडाचे पाणी टाके आहे
कळसुबाई वविश्रामगडाच्या मध्यावर बितनगडामुळे या परिसरातील सौंदर्यात व पर्यटनात भर पडते. गडाच्या पश्चिमेला ईगतपुरी तालुक्यातील टाकेद व वसाळी परिसराचा भूभाग एका नजरेत दिसतो. पावसाळ्यातील येथील सौंदर्य डोळ्यांचे पारने फेडते. पावसाच्या ठिकठिकाणी सरी, कोकणातून वाऱ्याच्या वेगाने येणारे ढग हे दृष्य बघणे म्हणजे पर्यटकांसाठी एक मेजवानीच असते. हिवाळ्यात डोंगराच्या मधून थांबलेले धुके, कधीकधी डोंगराच्या मधुन धावणारे धुके तर कधी धुक्यातुन वर डोकावणारे डोंगर, जणु काही चित्रकाराने रंगवलेले चित्रच. येथील प्राकृतिक सौंदर्याचा आनंद घ्यावयाचा असल्यास या गडावर पावसाळा किंवा हिवाळयात जाणे हेच सर्वोत्तम.
विश्रामगडाच्या पश्चिमेकडून सिन्नर व अकोले यांना जोडणारा खिंड रस्ता आहे. या मार्गातून होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असावा. या किल्ल्यावरुन दिसणारा महाकाल डोंगर व या डोंगराच्या पोटात असलेली बाडगीची माची यांचाही ऐतिहासिक सबंध असवा. आदिवासी वीर राघोजी भांगरे यांचे आश्रयस्थान असलेल्या महाकाल डोंगराच्या बाडगीच्या माचीतून संपूर्ण बितनगड सहज आणि एका दृष्टीक्षेपात दिसतो. त्यामुळे इतिहासाच्या पाऊलखुणा या दोन्ही ठिकाणांचा संदर्भ सहजपणे लावतात.
बितनगडावर कातळात कोरलेल्या पायऱ्या, असलेली गुहा व पाण्याचे टाके सोडल्यास गडावर उल्लेखनीय असे काही नाही. . मात्र या किल्ल्यावरुन बाजूच्या मोठ्या भूप्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी, टेहळणीसाठी या किल्ल्याचा वापर पूर्वी केला जात असावा.
लेखन : श्री. अरविंद सुभाष सगभोर ( M.A.History )
संपर्क : 7218663377
ई-मेल : arvind@bhatkya.in