सह्याद्रीतील अप्रिचित प्राकृतिक आश्चर्य, चेमदेव सुळका. अकोले-उंचखडक देवगावमार्गे ३५ किमी अंतरावर आपण खिरविरे फाटा येथे पोहोचतो. तेथुन पुढे उजवीकडे दोन-तीन किमी अंतरावर हा निसर्गाचा आविष्कार आपल्याला एका सुळक्याच्या रुपात दिसून येतो. खिरविरे गावच्या दक्षिणेला एकाकी असलेला पिंडीसारखा दिसणारा हा डोंगर पर्यटकांचे सहज लक्ष वेधून घेतो. मात्र लहानशा सुळक्यासारखा हा डोम्गर का पहावा ? म्हणुन अनेक पर्यटक तिकडे वळत नाहीत. खरं तर अकोले तालुक्यात पर्यटकांची बाराही महिने वर्दळ असते. मात्र या ठिकाणाला भेट देणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. चेमदेव डोंगराच्या पायथ्यापर्यंत गाडी रस्ता आहे. तेथुन पुढे डोंगर वाटेने आपल्याला जावे लागते. खिरविरे फाट्यापासून जाणाऱ्या रस्त्याने ३-४ किमी अंतरावर जि.प.शाळा धारेवाडीपासून थोडे पुढे शेताच्या बांधापर्यंत चारचाकी वाहन जाते. दुचाकीवरून गेल्यास वनखात्याच्या हद्दीपर्यंत डोंगर पायथ्यालगत जाता येते.
वाहन उभे करत समोर दिसणारा चेमदेवाचा उंच सुळका आपले लक्ष वेधून घेतो. पावसाळ्यात तर डोंगराला बिलगलेल्या ढगांच्यावरती हा सुळका डोकावताना दिसतो. सुळका असलेला चेमदेव डोंगर त्याच्या पूर्वेकडे दोन टेकडीसारखे दिसणारे दोन लहान डोंगर आहेत. स्थानिकांच्या सांगण्यानुसार पूर्वेकडून पहिला भागडा डोंगर होय. याच डोंगराच्या पायथ्यापासून चेमदेवाच्या सुळक्याकडे प्रवास सुरु होतो. या डोंगराच्या शेजारचा पश्चिमेकडील लहानसा डोंगर उकुरडा डोंगर म्हणून ओळखला जातो. याच डोंगराच्या पोटाने आपण चेमदेवाच्या पायथ्याला पोहोचतो. येथे दोन्ही डोंगरांच्या मध्ये वाघ्या हे दैवत आहे. दोन लाकडी व दोन दगडी तुळया व एक घडीव वाघ्याची मूर्ती याठिकाणी स्थापन केलेली आहे. वाघ्याचे हे ठिकाण चेमदेव व उकुरडा या दोन्ही डोंगरांच्या खिंडीत आहे. मात्र भागडा व उकुरडा डोंगरांच्या मध्ये दळणवळणासाठी वापरल्या जाणाऱ्या खिंडीला वाघ्याची खिंड म्हणतात. येथुन खाली पाभुळवाडीकडे जाण्याचा मार्ग आहे. खिंडीतील वाघ्याचे दर्शन घेत व उत्तर आणि दक्षिणेकडील विस्तीर्ण भूप्रदेश न्याहाळत पश्चिमेकडे जाणाऱ्या डोंगरवाटेने चेमदेव डोंगराच्या दिशेने निघावे. या डोंगरावर वाघ्याच्या पश्चिमेकडून डोंगराच्या दिशेने जाणारी सुरक्षित डोंगरवाट आहे. अरुंद व तीव्र उतार असलेली ही वाट दमछाक करणारी असली तरी आल्हाददायक आणि सुरक्षित आहे. डोंगराचा हा टप्पा चढून गेल्यावरडावीकडे तीव्र कडा आहे. मात्र तेथे सुरक्षेच्या कारणास्तव आडवे बांबू बांधलेले आहेत. हा टप्पा पार करुन चेमदेव डोंगराच्या सपाट भूभागावर आपण पोहोचतो. येथेही शेंदूर लावलेले काही दगड दिसून येतात. याठिकाणीही वाघ्याचे स्थान आहे. पुन्हा एकदा वाघ्याचे दर्शन घेत उजवीकडे जाणाऱ्या डोंगरवाटेने थोडे पुढे जावे. याठिकाणी वाटेतच एक लहानसे कातळातील कोरीव पाणी टाके आहे. संपूर्ण डोंगरावरील एकमेव पाणी टाके. हे पाणी टाके पाहत पुन्हा माघारी वाघ्यापर्यंत पोहोचावे. येथुन पुन्हा सुळक्याच्या दिशेने जाणाऱ्या डोंगरवाटेने पुढे जावे. निसरडी व तीव्र उताराची ही वाट जपून चढावी. ही वाट आपल्याला थेट सुळक्याच्या पायथ्याला घेऊन जाते. कच्च्या खडकाचा हा सुळका तीव्र उताराचा व अरुंद असा आहे. सुळक्याच्या पायथ्याला पोहोचल्यावर डावीकडे एक सुळक्यावर जाणारी कडेवाट आहे. त्या वाटेने वरती गेल्यावर सुळक्यावर एक झेंडा दिसून येतो. सुळक्यावर कोणतीही कोरीव काम आढळून येत नाही.
सुळक्यावरुन आजुबाजूचा संपूर्ण परिसर सहजतेने नजरेत येतो. या लहानशा सुळक्याच्या माथ्यावरुन आपल्याला दक्षिणेकडील निळवंडे धरण परिसर, पश्चिमेकडील रतनगड, पाबरगड, कळसुबाई डोंगर रांग, तर उत्तरेकडील महाकाळ पर्वत व पट्टा रांगा हा विस्तृत परिसर दिसून येतो. पुन्हा माघारी सुळक्याच्या पायथ्यापर्यंत यावे, येथेच पुढे सुळक्याला असलेले मोठे छिद्र त्याखाली असलेल्या दगडी पायऱ्या दिसतात. दगडी पायऱ्या चढत सुळक्याच्या गुहेत शिरावे. खरे तर ही गुहा नसून सुळक्याला आरपार असलेले नैसर्गिक नेढे आहे. सुळक्यात उत्तरेकडून प्रवेशासाठीचा मार्ग आहे. सुरुवातीला प्रवेशाच्या ठिकाणी हे नेढे ५-६ फूट उंचीचे आहे. मात्र आतमध्ये ते निमुळते होत गेले आहे. १५-२० फूट आत गेल्यावर तेथे एक प्राकृतिक चमत्कार दिसून येतो. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या या नेढ्याला छेदणारे पूर्व-पश्चिम दुसरे नेढे आपल्याला पहावयास मिळते. खरं तर हा या डोंगररांगांतील एक नैसर्गिक चमत्कार होय. चेमदेव हे दुहेरी भुयार असलेले व दोन्ही भुयारे एकमेकांना छेद देणारे तालुक्यातील एक नैसर्गिक आश्चर्य आहे. मात्र अकोले तालुक्यातील हा नैसर्गिक चमत्कार पर्यटकांना माहितीच नाही. या अरुंद नेढ्यातून एका वेळी एकाच व्यक्तीला आतमधे जाता येते. नेढ्यांच्या या चौकात उभे राहिल्यावर आपल्याला उत्तर, दक्षिण व पूर्व बाजूच्या नेढ्यांची टोके दिसून येतात, मात्र पश्चिमेकडील नेढ्याचे तोंड दिसत नाही ते उजवीकडे थोडे वक्राकार आहे. याच मार्गात काही तांदळे ठेवलेले आहेत. हेच आदिम दैवत चेमदेव होय. यातील उत्तरेकडचा मार्ग अरुंद असला तरी एका व्यक्तिला खाली वाकून सहजआतमध्ये जाता येते. मात्र दोन्ही नेढ्यांच्या संगमावर गेल्यावर तेथुन जाणारे बाकी तिनही मार्ग अरुंद आहेत. पूर्वेकडील मार्ग उंच मात्र अतिशय अरुंद आहे. तसाच उत्तरेकडीलही मार्ग अरुंद आहे. या दोन्ही मार्गांनी पुढे जाणे मला शक्य झाले नाही मात्र लहान मूले अगर सडपातळ व्यक्ती पुढे जाऊ शकतात. पश्चिमेकडील नेढ्यातून चेमदेवाच्या तांदळ्यापर्यंत जाणे शक्य आहे, मात्र मार्गात तांदळा असल्यामुळे पुढे जाणे शक्य होत नाही. येथेच तांदळ्याचे दर्शन घेत माघारी फिरावे, पावसाळ्यातील व हिवाळ्यातील येथील अवर्णनीय दृष्य म्हणजे या नेढ्यांतून आरपार जाणारे बाष्पकण व धुके. प्रकृतीचे हे आशचर्य व सौंदर्य डोळ्यांत साठवत आल्या वाटेने पुन्हा माघारी फिरावे.
चेमदेवाच्या डोंगरावर बाराही महिने स्थानिक गुराखी असतात, त्यामुळे याठिकाणी भेट देण्यासाठी कोणताही कालावधी योग्य ठरतो. अतिशय निसर्गसंपन्न असणाऱ्या या डोंगरावर कधीही जाता येते. येथे चैत्रीमध्ये यात्रा भरते, मात्र यावेळी पाभुळवंडी गावचे ग्रामस्थ डोंगर पायथ्यालगतच हा उत्सव साजरा करतात. यावेळी निवडक ग्रामस्थ सुळक्यावर जातात. वाघबारस हा आदिवासी सही येथे मोठ्या उत्साहाने साजरा करतात. स्थानिक शेतकरी गोमातेच्या तुपाची वात याठिकाणी लावतात. इतिहासात या ठिकाणाचा उल्लेख आढळून येत नसला तरी, विस्तीर्ण अशा मोठ्या भूभागावर मध्येच असलेला हा एकमेव सुळका व सुळक्याला असलेली चारही दिशांना आरपार छेदणारी भुयारे, डोंगरावर योग्य खडक नसल्याने डोंगराच्या खालील बाजूला कोरलेले पाणी टाके, डोंगराजवळुन जात असलेला वाहतुकीचा मार्ग, उत्तरेकडील पट्टा रांगेतील लहान- मोठे किल्ले व पूर्व-दक्षिण बाजूला असलेली अकोले बाजारपेठ, यावरुन हा बुरुज टेहळणीसाठी वापरला जात असावा असे सहज लक्षात येते. येथेच जवळ आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे जन्मगाव देवगाव असल्याने हा सुळका इतिहासाचा प्रथमदर्शी साक्षीदार असावा हे निश्चित. सुळक्यावरुन पावसाळ्यातील व हिवाळ्यातील दृष्य पाहणे म्हणजे निसर्गप्रेमींसाठी व पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे.
लेखन : श्री. अरविंद सुभाष सगभोर ( M.A.History )
संपर्क : 7218663377
ई-मेल : arvind@bhatkya.in