पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरच्या उंच हद्दीवर असलेला गिरीदुर्ग. हरिश्चंद्रगड. गडावर पोहोचण्याच्या या तिन्ही जिल्ह्यातून गड वाटा आहेत. या गड माथ्यावर पोहोचल्यावर येथे प्राचीन मंदिराचा कळस सर्वप्रथम नजरेत पडतो. कातळाच्या आत असलेले हे मंदिर निश्चितच या प्राचीन स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. ( हरिश्चंद्र गडाविषयी ची माहिती सदर Blog तील हरिश्चंद्रगड या भागात सखोलपणे दिलेली आहे. येथे केवळ गडावरील प्राचीन मंदिर व मंदिराशी संबंधित आजूबाजूच्या वास्तूंचा उल्लेख केलेल्या आहे) या गड माथ्यावर पोहोचताच या पुरातन कातळ शिल्पा चा कळस डोळ्यात भरतो. मळगंगा नदीच्या उगमस्थानी असलेले हे दहाव्या शतकातील मंदिर शिल्प होय. झांज राजाने १२ नद्यांच्या उगमावर बांधलेल्या शिवालयं पैकी एक. मंदिर परिसरात प्रवेश करतानाच कातळात कोरलेले एक पाणी कुंड नजरेत येते. येथेच शेजारी एक कोरिव व रचीव दगडातील लहानसे मंदिर आहे. या लहानशा मंदिरा च्या बाजूला कोरीव दगडी अवशेष व मूर्ती ठेवलेल्या आहेत. येथे कातळात कोरीव नंदींचे आवशेषही आहेत. येथून पश्चिमेकडील दिशेला समोर मोठ्या प्रमाणात असलेल्या वृक्षा खालून मंदिराच्या दिशेने जावे. मंदिराच्या प्रवेश द्वारा अगोदरच आपल्याला कोरीव कातळात मंदिराचे काही अवशेष दिसून येतात. पावसाळ्यात या लहानशा मंदिरात पाणी भरलेले असते. पाण्यातून डोकावणारी गणेशाची मूर्ती लक्षवेधी आहे. या मंदिरा शेजारीच कोरीव कामातील सुंदर अवशेष दिसून येतात. गणेशाचे दर्शन घेत मंदिराच्या मुख्य कमानीजवळ पोहोचावे. पूर्वेकडील प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश होतो. मुख्य मंदिराच्या अगोदर कमाणीतून प्रवेश केल्यावर या कमाणीच्या दोन्ही अंगांना कातळात कोरलेले भव्य शिल्प आहेत. डाव्या भिंतीवर कोरलेला लेख आढळतो. प्रवेशद्वाराच्या उजव्या भिंतीवरही लेखाचे अवशेष आढळतात. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्या नजरेत भरतो तो प्राचीन शिल्पकलेचे हे आकर्षक मंदिर. मंदिरा समोर उभे राहिल्यावर जणू काही हे मंदिर कातळात कोरलेले भासते. या मंदिराच्या दक्षिण व पश्चिम दिशेला कोरलेल्या लेण्यांची दालने व पाण्याचे हौद आहेत. समोर नंदी असलेल्या या मंदिराला पूर्व आणि पश्चिम दोन दरवाजे आहेत. मंदिराच्या गाभार्यात मध्यभागी शिवलिंग आहे. हरिश्चंद्रेश्वराच्या या मंदिराचे प्रवेश द्वार, मंदिराचे खांब, भिंती आणि उंच शिखरावर मुक्तपणे कोरीव शिल्पकाम केलेले आहे. देव-देवता, प्राणी, याबरोबरच भौमितिक आकारांची आकर्षक गुंफण केलेली दिसते. मंदिरावरील शिल्पकाम पाहून काही काळ आपण सुन्न, स्तब्ध होतो.
निराकार शांतता असलेल्या या कातळातील मंदिराचा हाच प्रभाव चांगदेव ॠषींवरही पडला असावा. म्हणूनच चांगदेव ॠषींनी तपश्चर्या साठी या ठिकाणाची निवड केली असावी. चांगदेव ऋषींच्या येथील वास्तव्याचे ऐतिहासिक पुरावे सापडतात. चांगदेव ऋषींनी लिहिलेल्या 'तत्त्वसार' या ग्रंथातही या मंदिराचा उल्लेख आढळतो. मंदिराच्या आवारात कातळ खडकात कोरलेल्या अनेक गुहा आढळतात. त्यातील काही गुहा निवासासाठी योग्य आहेत. तर काही गुहांमध्ये पाण्याचे हौद आहेत. मंदिराच्या डावीकडील बाजूने प्रदक्षिणा सुरू केल्यावर दक्षिणेकडील दिशेला ओळीत लहान लहान मंदिरे व जमिनीत कोरलेली खोल पाणी टाके दिसून येतात. डावीकडील या बाजूला विठ्ठल -रुक्मिणी मंदिर व सिद्ध मंदिर महाविष्णू असा नामोल्लेख असलेली दोन मंदिरे व त्यांच्या प्रवेशद्वारावर केलेले नेत्रदीपक कोरीवकाम बघत मंदिराच्या पाठीमागच्या पश्चिम दिशेला जावे. मंदिराच्या पाठीमागील बाजूलाही मोठ्या गुहा व पाणी टाके आहेत. या ठिकाणी साधारणत: पाच फुट उंच कातळात कोरलेल्या विष्णू मूर्तीचे अवशेष खांबाला टेकून उभे केलेले दिसून येतात. मंदिराच्या उत्तरेकडे ही एक बंदिस्त गुफा व पाणी टाके दिसून येतात. उत्तरेकडूनही मंदिराला प्रवेश द्वार असल्याचे भासते. येथेच उत्तरेकडे अर्धवट दगडी भिंत आहे. येथुन मंदिराची पूर्ण प्रदक्षिणा करत पुन्हा मंदिराच्या कमानीतून माघारी यावे.
मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या ठिकाणी एक मोठी शीळा ठेवलेली आहे. त्या शीळे खाली एक गाभारा आहे. याच ठिकाणी चांगदेव ॠषींनी तपश्चर्या केल्याचे मानले जाते. माघारी परतल्यावर डावीकडील दिशेने खाली जाणाऱ्या गड वाटेने जावे. हरिश्चंद्रेश्वराच्या खालच्या दिशेला म्हणजे उत्तरेला ज्या दिशेने मळगंगा डोंगरउतारावरून खाली वाहत जाते, त्या दिशेला कातळ कड्यात कोरलेले एक मोठे लेणे आहे. यास केदारेश्वराचे लेणे म्हणतात. केदारेश्वराचे हे लेणे नेहमी पाण्याने भरलेले असते. थंडगार पाणी असलेले हे लेणे भाविकांसाठी पवित्र ठिकाण आहे. लेण्याच्या मधोमध एका मोठ्या ओट्यावर स्थापन केलेले विशाल शिवलिंग आहे. चार खांबांच्या मध्ये वसलेल्या या शिवलिंगाच्या भोवताली संपूर्ण लेणीत पाणी भरलेले असते. या चार खांबांपैकी एक खांब नामशेष झालेला असून, दोन खांब मोडलेल्या अवस्थेत आहेत. डावीकडील समोरचा खांब पूर्णपणे सुरक्षित असून उजवीकडील पाठीमागचा खांब नामशेष झालेला आहे. तर उरलेले दोन खांब अर्धवट अवस्थेत केदारेश्वर कुंडाच्या छताला लटकलेले दिसून येतात. या विशाल व थंडगार पाण्याने भरलेल्या लेण्याच्या डावीकडील भिंतीवर कोरीव शिल्प आहे. त्यावर शिवपुजेचा देखावा कोरलेला आहे. या भव्य केदारेश्वर कुंडाच्या पाण्यात भाविक पवित्र स्नान करतात व या शिवलींगाला प्रदक्षिणा घालतात. यावेळी या पाण्याला चक्राकार गती प्राप्त झालेली असते. त्यामुळे आपण आपोआप या शिवलींगा भोवती वर्तुळाकार फिरत राहतो.
केदारेश्वराच्या या लेणी पासून पुन्हा मंदिराच्या दिशेने वरती यावे. मंदिराच्या दक्षिणे कडे एक मोठे जलकुंभ आहे. पुष्करणी. घडीव दगडातील पाण्याने भरलेल्या या पुष्करणी मुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. या पुष्करणीच्या दक्षिण बाजूला एका ओळीत १४ कोनाडे आहेत. या कोनाड्यांमध्ये पूर्वी देवतांच्या मूर्ती होत्या. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्या मूर्ती मंदिर परिसरातील खोलीत ठेवलेल्या आहेत. हे १४ कोनाडे अतिशय सुंदर व कोरीव आहेत. यातील पहिल्या दोन कोनाड्यांमध्ये मुर्त्यांचे अवशेष आहेत. इतर सर्व कोनाड्यांमध्ये मूर्तीच्या स्थापनेचे पीठ आहे. याच पुष्करणीच्या पूर्वेकडील बाजूला दोन लहानश्या मंदिरांचे अवशेष आहेत. त्यातील एका मंदिरात शिवलिंग दिसून येते. अतिशय देखणी पुष्करणी पावसाळ्यात अधिकच सुंदर वाटते.
मंदिराच्या दक्षिणे कडे असलेल्या तारामती शिखराच्या पायथ्याला कातळ कड्यात कोरलेल्या गुहा आहेत. यातील एका गुहेत गणेशाचे शिल्प आहे. त्या ठिकाणी स्थानिक गुराखी राहतात. तसेच पर्यटकही येथे राहणे पसंत करतात. तीन जिल्ह्यांच्या हद्दीत असलेले हे मंदिर रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिराप्रमाणेच आहे. मात्र या मंदिरास नंदीमंडप व सभामंडप ही रचना दिसत नाही. मात्र संपूर्ण दगडात व भौमितिक आकारांची रचना करून साकारलेली ही आकर्षक वस्तू नळकत हेमाडपंथी वाटते. बांधकाम कोणत्याही शैलीतील असो, मात्र तीन जिल्ह्यांच्या एकत्रित उंच माथ्यावर असलेले हे प्राचीन मंदिर खूपच आकर्षक आहे. या मंदिर परिसरात अनेक लहान लहान मंदिरांचे अवशेष दिसून येतात. कातळावर कोरलेल्या सुंदर नक्षीकामाचे अवशेषही या परिसरात आढळून येतात त्यामुळे या प्राचीन मंदिराची भव्यता लक्षात येते. प्राचीन काळी हे वास्तु वैभव किती व्यापक आणि विशाल असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. पावसाळ्यात या भागातील ऊन-पावसाचा खेळ, मध्येच वाहणारे धुके, धुक्यात गडप होणारे मंदिर, तर कधी धुक्यातून दिसणारा मंदिराचा कळस, लहानमोठे असंख्य खळखळणारे धबधबे सर्वकाही अवर्णनीय. पावसाळ्यानंतर गड माथ्यावर फुललेली वेगवेगळ्या रंगाची रानफुले मनाला मोहित करून टाकतात. अतिशय निसर्ग संपन्न प्राचीन, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला तीन जिल्ह्यांचा हा संगम नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये जागा निर्माण करतो. हरीश्चंद्राच्या याच गडावर श्रावण महिन्यात व नवरात्रीत अनेक साधू ध्यान व पूजापाठ करण्यासाठी येथे येतात याच गडावर महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो.
शिवरात्रीच्या अगोदर सात दिवस येथे मोठ्या उत्साहात सप्ताह साजरा केल्या जातो. या वेळी परिसरातील लहान-थोर भाविक या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने हजेरी लावतात. केदारेश्वराच्या थंड पाण्यात तेवढ्याच भक्तिभावाने शिवलिंगास प्रदक्षिणा घालतात. श्रद्धाळू भाविक, इतिहास अभ्यासक आणि पर्यटक या सर्वांसाठीचे आवडते ठिकाण असलेल्या या मंदिराला भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने दिनांक ४ मार्च इ.स.१९०९ रोजी महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.
लेखन : श्री. अरविंद सुभाष सगभोर ( M.A.History )
संपर्क : 7218663377
ई-मेल : arvind@bhatkya.in