अहमदनगर, ठाणे आणि पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला. गिरीदुर्ग प्रकारातील या गडाची उंची समुद्रसपाटीपासून ४००० फूट आहे. गडवाटेने पाचनई गावापासून गडावर पोहोचण्यासाठी साधारणत: ३००० मिटर अंतर चालत जावे लागते. पावसाळ्यात व हिवाळ्यात या गडाचे सौंदर्य अवर्णनीय असते. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, रानफुले, पक्षी व प्राणी यामुळे हा परिसर आजही अतिशय समृध्द व संपन्न आहे. अकोले-राजूर-पाचनईमार्गे पूर्वेकडून आपण या गडावर पोहोचतो. अहमदनगर जिल्ह्यातुन गडावर पोहोचण्यासाठी तोलारखिंड किंवा पाचनई या दोन मार्गांपैकी एकाची निवड करावी लागते. ठाणे जिल्ह्यातुन गडावर येण्यासाठी नळीच्या वाटेने यावे लागते. नळीची वाट बेलपाड्यातून गडावर जाते. मात्र वाटेने ट्रेक करावा लागतो व त्यासाठी या वाटेची माहिती असणारी व्यक्ती सोबत असावी लागते. पुणे जिल्ह्यातुनही गडावर येण्यासाठी खिरेश्वरमार्गे सोपी वाट आहे. अशा प्रकारे अहमदनगर, ठाणे व पुणे या तिन्ही जिल्ह्यांतुन गडावर येण्यासाठी वेगवेगळ्या वाटा आहेत. हरिश्चंद्रगडाच्या पूर्व व उत्तरेकडून हरिश्चंद्रगडावर स्थानिकांची व पर्यटकांची नियमित ये-जा असते. पश्चिमेकडे असलेला भव्य कोकणकडा व दक्षिणेकडे असलेले तारामतीचे पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर यामुळे या दोन्ही बाजू येण्या-जाण्यासाठी प्राकृतिकदृष्ट्या बंदिस्त आहेत. अतिशय प्राचीन गडाच्या चारही दिशेला लहान डोंगरी किल्ले आहेत. या चारही डोंगरी किल्ल्यांवर भैरवनाथाची (बहिरोबाची) स्थापना केलेली आहे. त्यातील कोथळ्याचा भैरवगड, शिरपुंज्याचा भैरवगड, पाबरगडावरचा बहिरोबा आणि पुणे हद्दीत येणारा मांजरमाळचा बहिरोबा हे होत. या चारही बहिरोबांच्या मध्यावर हरिश्चंद्रगड आहे. वडीलधारी माणसे या भैरवनाथांना हरिश्चंद्राचे रक्षक मानतात. इतिहासात या चारही डोंगरी किल्ल्यांवरुन हरिश्चंद्रगड व गडाच्या आजुबाजूच्या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जात असावे असे त्यांच्या रचनेवरुन लक्षात येते.
पाचनई गावातून गडावर पोहचण्यासाठी चार टप्प्यांत प्रवास करावा लागतो. त्यातील पहिला टप्पा पंधरा मिनिटांच्या अंतरावरील माचीपर्यंत घेऊन जातो. येथे डावीकडे असणारा वरंजा धबधबा पावसाळ्यात आपले लक्ष वेधून घेतो. धबधबा बघत डोंगरवाटेने जात असताना दुसऱ्या टप्प्यातील मार्ग अवघड व तीव्र चढणीचा आहे. कातळात कोरलेल्या पायऱ्या वजास्त उंचीच्या रचीव दगडी पायऱ्या यामुळे या टप्प्यात दमछाक होते. वनपर्यटन विभागाने या मार्गात रेलिंग केल्यामुळे हा टप्पा पर्यटकांना थोडा दिलासादायक झाला आहे. हा अवघड टप्पा चढत असताना डोक्यावर दिसणारा भव्य कडा आपल्यावर झेपावतोय असे वाटते. पंधरा-वीस मिनिटांचा हा प्रवास सावधपणे करावा लागतो. हा टप्पा चढल्यावर थेट आडव्या कड्याखाली आपण पोहोचतो. येथेच स्थानिक लोक उन्हाळ्यात सरबत तर पावसाळ्यात कणीस व चहा घेऊन आपल्या स्वागतासाठी बसलेले असतात. सरबत, चहा घेत येथे थोडा वेळ थांबावे व आडव्या कड्या खालच्या वाटेने उजवीकडे जाणाऱ्या दिशेने गड प्रवास सुरु ठेवावा. पावसाळ्यातील येथील दृष्य अतिशय विलोभनीय असते. पंधरा मिनिटांच्या आडव्या कड्याखालच्या प्रवासात कड्यावरुन कोसळणारे असंख्य धबधबे पर्यटकांना मोहित करतात. पर्यटक या वाटेवर मनसोक्त ओलेचिंब होतात. यावेळी धबधब्यांच्या आतील बाजूने चालत असताना आपल्या डोक्यावरुन कोसळणारे धबधबे खरोखरच अवर्णनीय. निशब्द करुन टाकणारे. यावेळी समोरच्या डोंगरावरुन वाहणारे पांढरे शुभ्र धबधबेही आपले लक्ष वेधून घेतात. अशा या असंख्य धबधब्यांच्या रांगेतून आपण आडव्या कड्याच्या पुढील मोकळ्या जागेत पोहोचतो. तेथुन डावीकडे जाणारी डोंगरवाट आपल्याला थेट गडावर घेऊन जाते तर उजवीकडे कड्यावरुन जाणारी डोंगरवाट थेट कोकणकड्याकडे घेऊन जाते. मात्र या वाटेने कोकणकड्याकडे जाणे प्रकर्षाने टाळावे. डावीकडील जाणाऱ्या गडवाटेने आपला प्रवास सुरु ठेवावा. पावसाळ्यात या मोकळ्या खडकावरुन खळखळ वाहणारे पाणी व दरीत पसरलेले मधुके यामुळे हे वातावरण अतिशय रमणीय व स्वप्नवत वाटते. मात्र खडकावरुन वाहणाऱ्या या पाण्यात जाणे टाळावे, कारण या पाण्याच्या खाली खडकात खोल खळगे आहेत. ज्यात उन्हाळ्यातही पाणी असते. वाहत्या पाण्याच्या डावीकडील बाजूने येथील निसर्ग डोळ्यात साठवावा व पुढील प्रवास सुरु ठेवावा. या टप्प्यापर्यंत आपल्याला साधारणत: पाऊण तास लागतो. येथुन पुढे गडावर पोहचण्यासाठीही तेवढाच वेळ लागतो. खडकाच्या डावीकडील गडवाटेने पुढे जात असताना पुढे पुन्हा जंगलवाट सुरु होते. येथेच उजवीकडे कड्यावरुन कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा आपले लक्ष वेधून घेतो. मंदिरापासून वाहत येणारे मळगंगा नदीचे पाणी उंच कड्यावरुन धबधब्याच्या रुपात कोसळताना दिसते, लहाणी फॉल म्हणतात. येथेच डावीकडे जंगलातून वाहत येणारा नदीसारख ओढा व त्याच्या आजुबाजूने नदीपात्रात डोकावणारे असंख्य वृक्ष आपल्याला याप्रवासात नकळतपणे आनंद देऊन जातात. वनपर्यटन विभागाने येथे एक सुंदर अर्धवतुळाकार लोखंडी पूल तयार करुन येथील सौंदर्यात भर घातली आहे, हे सर्व बघत पुन्हा जंगल प्रवास सुरु होतो. उंच झांडांतून निसरड्या वाटेने पुढे जात असताना पायांची थरथर होते. हा गर्द झाडीचा टप्पा चढल्यावर माथ्यावरच्या मोकळ्या जागेत पोहचतो. येथुन हरिश्चंद्रेश्वरचा मंदिराचा कळस दिसतो. पावसाळ्यात मात्र फक्त पाऊस अन धुक्याचे पांढरे शुभ्र पांघरुण आच्छादलेले दिसते. या आडव्या माचीवरुन आपण पुढे कोठे चाललो आहे हे उमजत नाही. काही पर्यटक तर रस्ता चुकलो की काय या शंकेत असतात. कारण या वाटेवर झाडे मानवनिर्मित टेंट किंवा अडथळे असे काहीही आढळत नाही. धुक्यातून वाट शोधत माळरानातून चालताना तारांबळ उडते. मात्र जी रानवाट डोळ्यांसमोर दिसत आहे त्या रानवाटेने पुढे चालत गेल्यावर आपण मंदिर परिसरात पोहचतो. येथे कातळात कोरलेले लहानसे पाणी टाके, रचीव मंदिर व दगडी कोरीव अवशेष दिसतात. (मंदिर परिसरातल्या सर्व स्थापत्य व कोरीव काम याविषयी आपण हरिश्चंद्रेश्वर या लेखात उल्लेख केलेला आहे. येथे गडावर गडाशी सबंधित बाबींचाच जाणीवपूर्वक उल्लेख केला आहे.) येथुन पुढे उजवीकडे गेल्यावर हरिश्चंद्रेश्वराचे प्राचीन शिवालय, केदारेश्वराची अप्रतिम गुहा, चौदा कोनाडे असलेली पुष्करणी या प्राचीन स्थापत्याचे निरिक्षण करत दक्षिणेकडे जाणाऱ्या शिखरवाटेने जावे.
शिखरवाटेने डोंगरपायथ्याशी पोहचल्यावर येथे सहा कोरीव गुहांचे काम लक्षवेधी आहे, या कोरीव कामावरुन येथे मोठ्या संख्ये वास्तव्य असल्याचे सहज लक्षात येते. येथे एकाच ओळीत भव्य व विस्तृत अशा सहा गुहा दिसून येतात. या गुहा पाहण्यास पूर्वेकडून सुरुवात करुन पश्चिमेकडे पाहत जावे. या गुहांवर क्रमांक व नावे टाकण्यात आली आहेत. मात्र या नावांचे लेखन अलिकडच्या काळातील आहे. नावानुसार गुफांची ओळख पटते. येथे ओळीत असलेल्या अतिशय भव्य व कोरीव या सहा गुफामध्ये स्थानिक गुराखी व पर्यटक राहणे पसंत करतात. या गुफांचे वैशिष्ट्ये म्हणजे गुफांच्या दुतर्फा पाणी टाके आहेत. काही गुफांना मुखाजवळ लहान आकाराचे कोरीव काम दिसून येते. या गुफा बघुन झाल्यावर तसेच पुढे जाणाऱ्या रानवाटेने कोकणकड्याकडे जावे. लहानसा टप्पा चढत व पुन्हा उतरत आडव्या वाटेने पश्चिमेकडे पंधरा-वीस कैले मिनिटांत आपण कोकणकड्याकडे पोहचतो. अर्धगोलाकार व आतील बाजूने माठाच्या पोटाप्रमाणे गोलाकार असलेला कोकणकडा पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण. याच कड्याच्या उजवीकडून असलेल्या नळीच्यावाटेने कोकणातूनयेणारे पर्यटक ट्रेक करुन गडावर येतात. येथे पावसाळ्यात सर्वत्र दाट धुके असल्यामुळे कोकण दर्शन होत नाही, मात्र पावसाळ्यापूर्वी येथे इंद्रवज्र पाहण्यासाठी अनेक पर्यटक तळ ठोकून बसतात. उन्हाळ्यात कोकणकड्याचा विस्तिर्ण भूभाग एका दृष्टीक्षेपात दिसतो. यावेळी कोकणकड्यावरुन कोकण न्याहाळत असताना गडाच्या उंचीची कल्पना येते. सायंकाळचे सोनेरी दृष्य व मध्यात मावळणारा सूर्य बघण्यासाठी अनेक पर्यटक सुर्यास्ताच्यावेळी येथे येणे पसंत करतात. बऱ्याचदा दुर्गप्रेमी पर्यटक रात्रीची नीरव शांतता, कोकणकड्याला आदळणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यापासून निर्माण होणारे संगीत, रात्रीच्या शांततामय वातावरणात होणारी झाडांच्या पानांची लयबध्द सळसळ व त्याला साद देणारे जंगली पशु-पक्ष्यांचे आवाज या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी याठिकाणी पर्यटक बऱ्याचदा जाणीवपूर्वक मुक्काम करणे पसंत करतात. कोकणकड्यावरुन हे विहंगम दृष्य आपल्या नेत्रपटलावर साठवत डावीकडील वाटेने गडाचा शेवटचा टप्पा चढण्यास सुरुवात करावी. कड्याच्या वरुन जाणाऱ्या व मोठ्या दगडांपासून जाणाऱ्या वाटेने प्रवास सुरु ठेवावा. यावेळी डोंगराच्या दिशेने वरती जाणाऱ्या जंगलवाटेने चालत रहावे. येथे एक लोखंडी शिडी आपल्या मदतीला धाऊन येते. या शिडीवरुन चढत माचीवर पोहचावे. पुन्हा एक टप्पा पार करत आपण दोन लहानशा सुळक्यांमधे येऊन पोहचतो. दोन लहानशा सुळक्यांच्या मधल्या सपाट भागावर थोडे विसावत समोर दिसणाऱ्या पुणे जिल्ह्याचे प्राकृतिक सौंदर्य न्याहाळावे. येथुन जुन्नरजवळील पिंपळगाव जोगा धरणाचा दिसणारा जलाशय व पर्यटकांचे आवडते ठिकाण माळशेज घाट नजरेच्या एका टापूत दिसतो. पुणे जिल्ह्यातील दिसणाऱ्या असंख्य उंच पर्वतरांगा यावेळी ठेंगण्या वाटतात. येथुनच पूर्वेकडे दिसणाऱ्या सुळक्यावर फडफडणाऱ्या ध्वजाच्या दिशेने जावे. येथे पोहचल्यावर हरिश्चंद्र गडाच्या उंचीची व आजुबाजूला दिसणाऱ्या सह्याद्रीच्या भव्यतेची कल्पना येते. हे उंच टोक तारामतीचे शिखर म्हणून ओळखले जाते. तारामतीचे उंच शिखर म्हणजे पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण होय. पुणे जिल्ह्याच्या सर्वात उंच ठिकाणाला वंदन करत पुन्हा पायथ्याकडे घेऊन येणाऱ्या रानवाटेने हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिर परिसरात परतावे. हरिश्चंद्रगडाचा संपूर्ण चक्कर पूर्ण करत आपण मंदिर परिसरात पोहचतो. गडावर आल्यावाटेने पुन्हा माघारी पाचनई गावात पोहचावे.
आदिवासी कोळी महादेव जमातीच्या इतिहासाची पार्श्वभूमी लाभलेला हा गड. चारही बाजूंनी उंच कड्यावर असलेल्या या गडाचा उल्लेखप्राचीन अग्णीपुराणात व मत्स्यपुराणातही आढळतो. कडे-कपारींचे संरक्षण लाभलेल्या या गडाला मोगलांनी आदिवासी कोळी महादेव यांचेकडून हस्तगत केला. मात्र १७४७-४८ मध्ये मराठ्यांनी तो मोगलांकडून ताब्यात घेतला व कृष्णाजी शिंदे यांना किल्लेदार म्हणून नेमले. आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे वडील रामजी भांगरे हे या किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार. यानंतर १८१८ मध्ये ब्रिटिशांनी तो ताब्यात घेतला. पौराणिक कथांनुसार व हरिश्चंद्र, तारामती व रोहिदास या शिखरांच्या नावांवरुन गडाचा संबंध थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत जाऊन पोहोचतो. गडावर कोठेही किल्ला भासावा अशा प्रकारची तटबंदी किंवा बांधकाम दिसून येत नाही. दहाव्या-अकराव्या शतकात राजा झंझ याने बांधलेल्या मंदिरांपैकी एक मंदिर त्याठिकाणी आढळते. यालाच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर म्हणतात. या मंदिराची उंची अंदाजे सोळा मीटर आहे. या मंदिराविषयी अनेक कथा स्थानिकांकडून ऐकावयास मिळतात. या मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे त्यात पूर्वी अनेक मुर्त्या ठेवलेल्या असल्याचे स्थानिक सांगतात. मंदिराच्या शेजारीच एक पूल आहे. त्याखालुन एक ओढा वाहत येतो. यालाच मळगंगेचा उगम मानतात. मंदिर परिसरात अनेक गुहा आहेत. यातील काही गुहा राहण्यायोग्य आहेत. काही गुहांमध्ये थंड पाणी आहे. मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या गुहेत एक चौथरा आहे. चौथऱ्याखाली जमीनीत एक गुहा आहे. यावर मोठी शिळा ठेवलेली आहे. या खोलीतच चांगदेव ऋषींनी १४ वर्षे तप केल्याचे मानले जाते. तशा प्रकारचे लेखही आढळतात. चांगदेवांनी तपश्चर्या करुन तत्त्वसार ग्रंथ लिहिला. मंदिर परिसरात अनेक लेख व मुर्ती काम केलेले आढळून येते. मुर्तीकामातून काही प्रसंग चित्रित केलेले आढळतात. मंळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने उत्तरेकडे खालच्या बाजूला गेल्यास तेथे एक मोठी गुहा आढळते. यालाच केदारेश्वराची गुहा म्हणतात. या गुहेत एक मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगाभोवती खांद्या इतके पाणी आढळते. गुहेतील पाणी बर्फासारखे थंड आहे. मात्र महाशिवरातीला भाविक याच पाण्यातून शिवलिंगाला प्रदक्षिणा घालतात.
आदिवासी कोळी महादेव जमातीच्या इतिहासाची पार्श्वभूमी लाभलेला हा गड. चारही बाजूंनी उंच कड्यावर असलेल्या या गडाचा उल्लेखप्राचीन अग्णीपुराणात व मत्स्यपुराणातही आढळतो. कडे-कपारींचे संरक्षण लाभलेल्या या गडाला मोगलांनी आदिवासी कोळी महादेव यांचेकडून हस्तगत केला. मात्र १७४७-४८ मध्ये मराठ्यांनी तो मोगलांकडून ताब्यात घेतला व कृष्णाजी शिंदे यांना किल्लेदार म्हणून नेमले. आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे वडील रामजी भांगरे हे या किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार. यानंतर १८१८ मध्ये ब्रिटिशांनी तो ताब्यात घेतला. पौराणिक कथांनुसार व हरिश्चंद्र, तारामती व रोहिदास या शिखरांच्या नावांवरुन गडाचा संबंध थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत जाऊन पोहोचतो. गडावर कोठेही किल्ला भासावा अशा प्रकारची तटबंदी किंवा बांधकाम दिसून येत नाही. दहाव्या-अकराव्या शतकात राजा झंझ याने बांधलेल्या मंदिरांपैकी एक मंदिर त्याठिकाणी आढळते. यालाच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर म्हणतात. या मंदिराची उंची अंदाजे सोळा मीटर आहे. या मंदिराविषयी अनेक कथा स्थानिकांकडून ऐकावयास मिळतात. या मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे त्यात पूर्वी अनेक मुर्त्या ठेवलेल्या असल्याचे स्थानिक सांगतात. मंदिराच्या शेजारीच एक पूल आहे. त्याखालुन एक ओढा वाहत येतो. यालाच मळगंगेचा उगम मानतात. मंदिर परिसरात अनेक गुहा आहेत. यातील काही गुहा राहण्यायोग्य आहेत. काही गुहांमध्ये थंड पाणी आहे. मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या गुहेत एक चौथरा आहे. चौथऱ्याखाली जमीनीत एक गुहा आहे. यावर मोठी शिळा ठेवलेली आहे. या खोलीतच चांगदेव ऋषींनी १४ वर्षे तप केल्याचे मानले जाते. तशा प्रकारचे लेखही आढळतात. चांगदेवांनी तपश्चर्या करुन तत्त्वसार ग्रंथ लिहिला. मंदिर परिसरात अनेक लेख व मुर्ती काम केलेले आढळून येते. मुर्तीकामातून काही प्रसंग चित्रित केलेले आढळतात. मंळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने उत्तरेकडे खालच्या बाजूला गेल्यास तेथे एक मोठी गुहा आढळते. यालाच केदारेश्वराची गुहा म्हणतात. या गुहेत एक मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगाभोवती खांद्या इतके पाणी आढळते. गुहेतील पाणी बर्फासारखे थंड आहे. मात्र महाशिवरातीला भाविक याच पाण्यातून शिवलिंगाला प्रदक्षिणा घालतात.
मंदिराच्या दक्षिणेकडे तारामती शिखराच्या दिशेने तीर्थक्षेत्र आहे. तेथुनच तारामती शिखराच्या पोटाला काही गुहा आढळतात. यातील काही गुहा स्थानिक लोक, गुराखी राहतात. येथुन उजवीकडे वळसा घेत आपण कोकण कड्याकडे पोहोचतो. हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षक म्हणजे कोकणकडा. अर्धगोलाकार व जवळपास ५०० मीटर परिघात असलेला काळ्या पाषाणातील हा कडा प्रत्येकाला पहावासा वाटतो. गिर्यारोहक व पर्यटकांचेआवडते ठिकाण. येथुन दिसणारा सुर्यास्ताचा देखावा अवर्णनीय आहे. पावसाला व हिवाळा या काळातील या गडावरचे पर्यटन म्हणजे एक पर्वणीच असते. येथुन दक्षिणेकडून पूर्वेकडे तारामती शिखराकडे आपण वळतो. तारामती शिखर हे पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर होय. याची समुद्रसपाटीपासून ४८५० फूट उंची आहे. शिखरावरुन पश्चिम व दक्षिणेकडील लहान-मोठे डोंगर व घनदाट जंगल न्याहाळता येते. एकाच दृष्टीक्षेपात माळशेज घाटाचे रुप डोळ्यासमोर दिसते. भौगोलिक विविधता व कुतुहलजनक इतिहास यामुळे हा गड नेहमीच अभ्यासक व पर्यटक यांना भुरळ घालत असतो. गडावरील प्राणी, पक्षी व वनस्पती यांची आढळणारी विविधता इतर कोठेही आढळत नाही. हे या गडाचे आणखी एक वैशिष्ट्ये होय. गडावर पोहोचण्यासाठीच्या वाटा या सरळ आहेत. मात्र गडावर पोहोचताना मधे पिण्याच्या पाण्याची सोय मात्र कोठेही नाही. आपल्याला सोबत पाण्याची व्यवस्था ठेवावी लागते. या गडावर पर्यटकांचा लोंढा दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या पर्यटनाचा विचार करत याठिकाणी वनपर्यटन विभागाने अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. यातुन अवघड ठिकाणी लोखंडी रेलिंग केलेली आहे. पर्यटकांमुळे स्थानिक आदिवासींनाही रोजगार मिळत आहे. मंदिराच्या पश्चिमेकडे कोकण कड्याकडे जाताना फसव्या वाटा आहेत. त्याठिकाणी दिशादर्शक गरजेचे आहेत. बऱ्याचदा पर्यटक रात्रीही गडावर किंवा कोकणकड्यावर मुक्काम करतात. त्यामुळे कोकण कडा ते मंदिर यादरम्यान पिण्याचे पाणी व वीजेची आवश्यकता आहे. कुतुहलजनक इतिहास, विस्मयकारक भूगोल, तटबंदी किंवा कोणतेही बांधकाम नसलेला सह्याद्रीतील अतिदुर्गम किल्ला, तीन जिल्ह्यांच्या सीमा असलेले उंचावरील ठिकाण यामुळे या गडाचे एक वेगळेच महत्व प्राप्त होते आणि म्हणुनच या गडाला निश्चितपणे भेट द्यावी. असा हा वैविध्यपूर्ण हरिश्चंद्रगड.
लेखन : श्री. अरविंद सुभाष सगभोर ( M.A.History )
संपर्क : 7218663377
ई-मेल : arvind@bhatkya.in