आढळा नदीच्या तीरावरील चहुबाजूंनी शीळखंडांनी बांधलेल्या उंच भिंतींच्या आवारातील बंदिस्त प्राचीन मंदिर. भव्यदिव्य दिसणाऱ्या या मंदिरावर लहान-मोठे पाच कळस दुरुनच दिसून येतात. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी अकोले-देवठाण-सावरगाव पाट मार्गे टाहाकारी किंवा अकोले-उंचखडक - समशेरपूर मार्गे टाहाकारी असे ३० किमी अंतरावरील प्रवास करुन या प्राचीन मंदिराजवळ पोहोचता येते. दोनही मार्गावरुन या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सारखेच अंतर आहे.
उत्तर-दक्षिण बांधकाम असलेले हे संपूर्ण घडीव कातळातील प्राचीन जगदंबा मातेचे मंदिर. या प्राचीन मंदिराचे कळस मात्र दुरुन निळसर आकाशी रंगाचे दिसतात. जीर्णोध्दार करताना सदर कळसांवर सिमेंटचा थर देण्यात आल्याने दुरुन हे मंदिर आधुनिक काळातले वाटते. मंदिरात पूर्वेकडील बाजूने प्रवेश केल्यावर मंदिराच्या उत्तरेकडील दिशेला असलेल्या प्रवेशद्वारासमोर पुन्हा सिमेंटचे छत (मंडप) टाकलेले आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर मात्र या प्राचीन मंदिराच्या स्थापत्य कलेने आपण आवाक होऊन जातो.या मंदिराच्या रचनेत मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. उंच दगडी जोत्यावर उभ्या असलेल्या या मंदिराच्या जोत्यावर पुष्प आणि पद पट्टी कोरलेली आहे. पुढे मुख्य मंडपात प्रवेश केल्यावर मंडपाच्या सज्जावरील कोरीव काम लक्षवेधी आहे. मुख मंडपातून मुख्य मंडप म्हणजे सभामंडपात प्रवेश करताना सर्वत्र कोरीव काम केलेले अनेक दगडी खांब आपल्याला अचंबित करुन टाकतात. यावेळी कोणत्या खांबाकडे बघावे हेच कळत नाही. प्राचीन स्थापत्य किती कौशल्याधिष्ठित व आकर्षक होते, याची आपल्याला निश्चितच कल्पना येते. सभामंडपाच्या सुरुवातीलाच खांबाला टेकून ठेवलेल्या दोन मूर्ती दिसून येतात. त्यातील एक शंकर-पार्वती व दुसरी गणपतीची आहे. या मुर्त्या नेहाळत पुढे सरकावे. समोरच कासवाचे अतिशय सुबक आणि लक्षवेधी धातूशिल्प आपले लक्ष वेधून घेते. येथुनच आपले लक्ष छताकडे जाते.अवर्णनीय. निशब्द करुन टाकणारे कोरीवकाम. अप्रतिम रचना. या वर्तुळाकार कोरीव कामात आठ अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. जणू काही त्यांनी या मंदिराचे छत पेललेले भासते. या नक्षी कामाबरोबरच सिंह व पुष्प यांचेही आकर्षक कोरीव काम दिसून येते. त्रीदल अंतररचना असलेल्या या मंदिराला तीन गाभारे आहेत. उत्तरमुखी असलेल्या या मंदिराला दक्षिण, पूर्व आणि पश्चिम दिशेला या तीन गाभाऱ्यांची रचना दिसून येते. दक्षिणेकडील मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्यामध्ये अंतराळ आहे. मुख्य गर्भगृहात देवीचा तांदळा ठेवलेला आहे. तांदळाच्या पाठीमागे वाघावर आरुढ असलेली आणि हातात वेगवेगळ्याप्रकारची शस्त्रे असलेली अठराभुजा असलेली जगदंबा मातेची काष्टक मूर्ती स्थापित केलेली आहे. जगदंबा मातेची लाकडातील ही मूर्तीही तितकीच सुंदर व रेखीव आहे. जगदंबा मातेची ही लाकडी मूर्ती २००-२५० वर्षांपूर्वीची आहे. ठाणगावचे सुतार शिरसाठ यांनी स्वतः तयार करुन या अष्टभूजा मूर्तीची स्थापना केली आहे.
मुख्य गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला म्हणजेच सभामंडपाच्या पूर्वेस व पश्चिमेस असलेल्या गर्भगृहातील पूर्वेकडील गर्भगृहात महालक्ष्मी व पश्चिमेकडील गर्भगृहात महाकाली देवीच्या आकर्षक मूर्तीची स्थापना केलेली आहे. या मूर्तीना रंगकाम केल्याचे दिसून येते. मूर्तीचे हे रंगकाम १९९० च्या दरम्यान जिर्णोध्दाराच्या वेळी केल्याचे सांगितले जाते. येथेच उजव्या कोपऱ्यात एक कातळात कोरीव शिवलिंग व काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिराची रचना करताना एकूण ७२ खांबावर केलेली आहे.जवळजवळ असलेले हे दगडी खांब तितकेच आकर्षक व कलाकृतिंनी परिपूर्ण असे आहेत. प्रत्येक खांबावरील कोरीव काम लक्षवेधी आहे. खांबावरील भौमितिक आकार बरोबरच वेगवेगळ्या प्रकारची नक्षी व शिल्पे कोरलेली आहेत. खांबाच्या टोकाला छत तोलणारे यक्ष काढलेले आहेत. छताच्या मधोमध कोरलेले एक लहानसे दगडी झुंबर आजही सुस्थितीत आहे. छताला कोरलेले झुंबर त्या काळच्या स्थापत्याची व उत्कृष्ट कौशल्यांची ओळख करुन देते. मंदिराच्या गाभाऱ्यातील कोरीव काम प्राचीन शिल्पकलेची ओळख करुन देते. अप्रतिम कोरीव कामातील खांब, गर्भगृहातील प्रवेशद्वार आणि सभामंडपाचे गोलाकार छत व त्यावरील कल्पक नक्षीकाम आणि अंतराळाच्या छतावरील लटकलेले दगडी झुंबर हे सर्व नेत्रदिपक कोरीव काम प्राचीन स्थापत्याचे वेगवेगळे आविष्कारन्याहाळत, प्राचीन स्थापत्याच्या या वैभवशाली कलांची कल्पना करत आपण मुख्य मंदिरातून पुन्हा बाहेर येत पूर्वेकडून मंदिराला प्रदक्षिणा घालावी. मंदिरात प्रवेश करतेवेळी मुखमंडपाच्या बाहेरील बाजूस अतिशय रेखीव आणि सुबक अशा अप्रतिम कामसूत्र शिल्पांची योजना केलेली दिसून येते. येथे मोठ्या प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. हे सर्व न्याहाळत मंदिराचा बाह्यभाग पाहण्यास सुरुवात करावी.मंदिराच्या अंतर भागात इतकाच सुंदर आणि आकर्षक या मंदिराचा बाह्यभाग अतिशय सुरेख स्थापत्याचा नमुना आहे. कोनात दुमडलेल्या रचनेमुळे निर्माण झालेल्या कोनाड्यांत सुंदर मूर्तीचे कोरीव काम केलेले दिसून येते. या मूर्ती कामातून नृत्य-वादन याबरोबरच शस्त्र धारण केलेल्या मूर्तीची रचना दिसून येते. या कोरीव कामास सुरसुंदरी म्हणतात. या संपूर्ण मंदिर परिसरात एकूण २२ सुरसुंदरींच्या वेगवेगळ्या रुपातील मूर्ती कोरलेल्या आहेत. ५.२ फूट उंचीच्या या मूर्ती प्रथम ५, त्यापुढे ६, पुढच्या टप्प्यात पुन्हा ६ आणि शेवटी पुन्हा ५ याप्रमाणे या सुबक मूर्तीची एका ओळीत आणि आकर्षक रचना केलेली आहे. मंदिराला पूर्वेकडून प्रदक्षिणा घालायवास सुरुवात केल्यावर पूर्वेकडील बाजूला प्रथम गणेशाचे दर्शन होते. यानंतर गर्भगृहाच्या मागील कोष्टकात चामुंडेची मूर्ती आहे. अक्राळ-विक्राळ रुप असलेली ही मूर्ती गळ्यात मुंडमाळा, पोटावर विंचू, दंडावर कवटी असलेली ही चामुंडेची क्रूर रुप धारण केलेली मूर्ती लक्षवेधक आहे. याच देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठीची पन्हाळी आहे. मात्र या पन्हाळी वर नेहमीच्या कोरीव कामातील गोमुख दिसून येत नाही. याठिकाणी अप्रतिम नक्षीकामातील मकरमुख कोरलेले दिसून येते. ३ फूट लांबी असलेले हे मकरमुख ३.२ फूट उंच व १.४ फूट रुंद आहे. यानंतर दक्षिणेला मुख्य गर्भगृहाच्यादेवकोष्टकात महादेवाची नृत्य करणाऱ्या मूर्तीचे कोरीवकाम आहे. महादेवांच्या पायथ्याशी तालवाद्य व बासरी वाद्य वाजवणारे मूर्तीकाम कोरलेले आहे. या कोष्टकाच्या महिरपीवर कोरीव कामातून ब्रम्ह-विष्णु-महेश दाखविलेले आहेत. पशिमेकडील गर्भगृहाच्या मागील देवकोष्टकातही महादेवाची हात तुटलेली मूर्ती आहे. डमरु,तलवार आणि त्रिशुळ हातात घेतलेली ही मूर्ती प्राचीन स्थापत्याचे दर्शन देते.प्राचीन मंदिराचा अंतर्भाग व बाह्यभाग पाहून झाल्यावर मंदिराच्या उत्तर दिशेने प्रवेशद्वारापासून पुढे जावे.
आढळा नदीच्या दिशेने गेल्यावर तेथे पायऱ्यांवर एक कोरीव खांब अपल्याला दिसतो. अतिशय देखण्या कोरीव खांबावर पुसट व अस्पष्ट शिलालेख आहे. या पायऱ्यांवर खालील दिशेला एका ओळीत तीन खांब उभे केलेले आहेत. या खांबांची उंची सरासरी ५.५ फूट इतकी आहे. याच घाटावर खांबांच्या रचनेसाठीचे गोल कोरीव दगड ठेवलेले आहेत. ८ इंच उंची असलेले व १.५ फूट व्यास असलेल्या या दगडांवर भौमितिक आकारांचे नक्षीकाम केलेले आहे. खांबाच्या उजव्या बाजूला शेष विष्णु भगवानाचे पुरातन मंदिर आहे. मोडकळीस आलेले हे मंदिर मात्र त्याच्या या अवस्थेतही आकर्षक व सुंदर दिसते. कोरीव व मजबूत दगडातील या मंदिराचे प्रवेशद्वार ४.१० फूट उंच आणि २.७ फूट रुंद आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात शेणाने घातलेला सडा मनप्रसन्न करतो. याठिकाणी शेष विष्णु भगवानाचई कोरीव मूर्ती आहे. उंच कळस असलेलेहे मंदिर अतिशय सुरेख व देखणे आहे. घाट व मंदिर परिसरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण दगड ठेवलेले आहेत. अष्टकोणी दगडांवर शिवलिंग व नंदी यांचे कोरीव काम केलेले दिसून येते.आढळा नदीच्या तीरावरील अतिशय सुंदर व प्रसन्न वातावरणातील या प्राचीन मंदिरात चैत्र पौर्णिमा उत्सव मोठ्या सोहळ्यात साजरा केला जातो. याचबरोबर नवरात्रीत येथे अनेक कार्यक्रम असतात. नवरात्रीत येथे सलग ११ दिवस सप्ताह असतो. या अकराही दिवस संपूर्ण गावाला चूलबंद जेवण असते. तसेच या दिवसांत येणाऱ्या सर्व भाविकांची येथे जेवणाची व्यवस्था केलेली असते. दसऱ्याच्या आदल्या दिवशी येथे मोठा होम केला जातो. जगदंबा मातेच्या या मंदिरातील सर्व धार्मिक कामे पूजारी त्रिंबक विश्वनाथ गिरी हे पाहतात. मंदिर जतन करण्याच्या उद्देशाने व भाविक पर्यटकांच्या सेवेसाठी ट्रस्टने येथे काही सुविधाही निर्माण केलेल्या आहेत. याच सुविधा निर्माण करताना मंदिरासमोरील रंगीत सभामंडप व दुरुस्तीसाठी नव्याने केलेले मंदिराचे कळस यांमुळे हे मंदिर दुरुन प्राचीन मंदिर वाटत नाही. आधुनिक मंदिराप्रमाणे हे मंदिर जवळ गेल्यावर मात्र आपल्या प्राचीन स्थापत्याचे दर्शन देते. त्याच्या प्राचीन स्थापत्य कलेला तसेचअबाधित ठेवलेले आहे. मंदिराची रचना ही त्याचे मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह यामुळे नागर शैलीची भासते. दगडांवरील नक्षीकाम व दगडांची खाच करुन एकमेकांत केलेली रचना यामुळे हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील भासते. प्राचीन काळातील या मंदिराची मोगल कालीन आक्रमणांमुळे नासधूस केली गेली होती. यावेळी मंदिराच्या कळसाची झालेली नासधूस यामुळे या कळसांची रचना लक्षात येत नाही. मात्र कळसही नागर शैलीचे असावेत असे वाटते. हे कळस दुरुस्त करताना घाण्यावर चूना फिरवून या कळसांवर लेप देण्यात आला व पुढे या कळसांचा जिर्णोध्दार करत त्यांची नव्याने रचना करण्यात आली. जिर्णोध्दारामुळे मंदिरावर असलेले कळस दुरुन आधुनिक काळाचे मंदिर असल्यासारखे दिसतात, मात्र जवळ गेल्यानंतर मंदिराचे प्राचीन वैभव आपल्याला मोहित करते. त्रीदल अंतररचना असलेल्या या मंदिराच्या तिन्ही गाभाऱ्यांना सामायिक सभामंडप आहे. हेच या जगदंबा माता मंदिराचे खास वैशिष्ट्ये व वेगळेपण आहे. मात्र हे पुरातन मंदिर संपूर्ण कातळातील कोरीव भौमितिक आकार व आकर्षक शिल्पांमध्ये अतिशय सुरेख व मोहक दिसते.हे प्राचीन स्मारक १९५८ च्या २४ व्या प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियमान्वये राष्ट्रीय महत्वाचे म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे.
लेखन : श्री. अरविंद सुभाष सगभोर ( M.A.History )
संपर्क : 7218663377
ई-मेल : arvind@bhatkya.in