मुळा नदीच्या काठी सुंदर आणि निसर्गसंपन्न वातावरणातील या मंदिराला पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. अकोले ते कोतूळ साधारणतः वीस किमी प्रवास केल्यावर कोतूळपासून शेतीतून वाट काढत साधारणत: एक किमी अंतरावरील या प्राचीन मंदिराजवळ आपण पोहोचतो. मुळा नदीच्या तिरी असलेले एक पौराणिक कथांशी जोडलेले मंदिर. मंदिराच्या बाहेरील ओट्यावर व परिसरात कोरीव कामातील प्राचीन शिल्प दिसून येतात. आकाराने लहान असलेल्या या मंदिरातील शिवलिंग मात्र आकाराने खूपच मोठे आहे. मात्र आकाराने खूपच मोठे आहे. मुख्य मंदिरासमोर अलिकडच्या मोठ्या सभामंडपाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. पौराणिक कथांनुसार व्यास लिखित महाभारतातील 'जैमिनि अश्वमेध ग्रंथात कुंतलेश्वर आत्ताचे कोतुळेश्वरचा उल्लेख आढळतो. याच ठिकाणी पांडवांचा विश्वविजयी अश्य अडविल्याची कथा आहे. पेशवेकालीन इतिहासही कोतूळ गावाशी जोडलेला आहे. एकंदरीतच पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले हे कोतुळेश्वराचे मंदिर. मुळा नदीच्या तीरावर विशाल पिंपळाच्या झाडाखाली असलेले कोतूळेश्वराचे मंदिर जिर्णोध्दारामुळे व समोरील भव्य मंडप आणि रंगरंगोटीमुळे अलिकडच्या काळातील वाटते, मात्र मंदिराच्या जवळ गेल्यावर पिंपळाच्या ओट्यावर असलेले कोरीव शिल्प आपले लक्ष वेधून घेतात. यातील एका दगडी शिल्पावर शिलालेख कोरलेला आढळून येतो. या कोरीव शिल्पाच्या पहिल्या ओळीत श्री सके १६४० असे कोरलेले दिसून येते. यामुळे हे मंदिर या कालावधीच्या अगोदरचे असावे असा स्पष्ट पुरावा सापडतो. मुख्य मंदिर आधुनिक सभामंडपाने झाकलेले आहेत. मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला रंगकाम केलेला नंदी दिसून येतो. नंदीच्या गळ्यातील कोरीव शेषनाग शिल्प लक्ष वेधून घेते. नंदीच्या समोर पूर्वेकडील प्रवेशद्वाराने मंदिराच्या मुख्य मंडपात आपण पोहोचतो. घडीव दगडातील या मंदिरात कोरीव शिल्प आढळून येत नाहीत. प्रवेशद्वारावर तुरळक कोरीव पुष्पशिल्प आढळतात. मुख्य मंडपातून पूर्व, उत्तर व दक्षिण या तिनही दिशेंना प्रवेशद्वार असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी उत्तरेकडील डाव्या कोपऱ्यात कोरीव कातळातील सन १९८८ - १९८९ ला मंदिराचा जीर्णोध्दार केल्याचा उल्लेख आढळतो. गर्भगृहात महादेवाचे विशाल शिवलिंग आहे. अकोले तालुक्यातील इतर मंदिरांच्या तुलनेने हे शिवलिंग आकाराने मोठे आहे. शिवलिंगावर लक्षवेधी कोरीव नाग शिल्प आहे.मंदिराला जीर्णोध्दार केलेले मुख्य मंडपावरील व गर्भगृहावरील दोन शिखरे आहेत. गर्भगृहावरील शिखराची उंची जास्त आहे.
मंदिर परिसरातून वाहत जाणाऱ्या याच मुळा नदीवरील ६०० द.ल.घ.फु.पाणी क्षमता असलेले पिंपळगाव खांड धरणाच्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यावर याठिकाणी मंदिर व मंदिर परिसरात पाणी भरते. मात्र अलिकडच्या काळात मुळा नदी पात्राच्या बाजूने मंदिराला उंच व मजबूत संरक्षक कठडा बांधल्यामुळे मुळा नदीचे पाणी अडविले जाते. यामुळे पावसाळ्यातील पाणी मंदिर परिसरात शिरत नाही. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर वेळी याच धरणातील पाणीसाठ्यामूळे मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मुळा नदी पात्रात पाणीसाठा टिकून राहतो. मुळा नदीच्या याच पाणीसाठ्यामुळे सौंदर्यात भर पडते. परिसरातील सर्वात मोठी महाशिवरात्रीची यात्रा याठिकाणी भरते. दूरदूरचे लाखो भाविक याठिकाणी महाशिवरात्रीला मोठ्या भक्तीभावाने व श्रध्देने नतमस्तक होतात.
लेखन : श्री. अरविंद सुभाष सगभोर ( M.A.History )
संपर्क : 7218663377
ई-मेल : arvind@bhatkya.in