अकोले तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगेतील एक मजबूत डोंगरी गड. गडावर जाण्यासाठी अकोले-राजूरमार्गे पुढे १५ किमी अंतरावरील गुहिरे या गावापासून सोंडेच्या वाटेने गडावर जाता येते. दुसरी वाट म्हणजे भंडारदरा गावापासून ५ किमी अंतरावरील मुतखेल या गावातून नळीच् वाटेने आपण पावर गडावर पोहोचू शकतो. तर तिसरी वाट तेरुंगण गावातून गडाकडे जाते. गडावर बहिरोबा देवस्थान असल्याने पाबरगडावर जाण्याच्या स्थानिकांच्या अनेक वाटा आहेत. मात्र दुर्गप्रेमी या गडावर जाण्यासाठी गुहिरे गावातून जाणारी सोंडेची वाट किंवा मुतखेल गावातून जाणारी नळीची वाट निवडतात. पर्यटकांना आवडती वाट, सोयीचा मार्ग म्हणजे गुहिरे गावातून जाणारी सोंडेची वाट. गुहिरे गावातून जाणाऱ्या या मार्गाने हत्तीच्या सोंडेसारख्या दिसणाऱ्या चिंचोळ्या डोंगरमाथ्यावरुन चालताना सह्याद्रीचे मोहक रुप आपल्याला पहावयास मिळते.
अकोले तालुक्याच्या सह्याद्री पर्वतरांगेतील एक मजबूत डोंगरी किल्ला. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वतरांगेतील हा रांगडा डोंगरी किल्ला पहावयाचा असल्यास अकोले राजूर मार्गे राजूरच्या पुढे भंडारदरा रोडला १५ किमी अंतरावरील गुहिरे गावातून जाता येते. गुहिरे गावातील मंदिराजवळ वाहन उभे करत मंदिराच्या पाठीमागून जाणाऱ्या गडवाटेने प्रवास सुरु करावा. सोंडेची ही वाट हतीच्या सोंडेसारख्या दिसणाऱ्या चिंचोळ्या डोंगरमाथ्यावरुन जाते. या वाटेने जाताना दोन्ही बाजूला असलेला तीव्र उतार व माथ्यावरुन जाणारी चिंचोळी वाट यामुळे आपल्याला या सह्याद्रीच्या थरारक प्रवासाबरोबरच वैभवाचेही दर्शन होते. गावाच्या पाठीमागे असलेल्या शेताच्या बांधावरुन जाणाऱ्या वाटेने जात असताना पुढे एक कातळकडा दिसतो. या कातळकड्याच्या खालील डोंगरवाटेने पुढे गेल्यावर कड्याच्या डावीकडील मोठ्याने अर्थात डोंगरवाटेने आपण गडवाटेच्या पहिल्या माचीपर्यंत पोहोचतो. या माचीपर्यंत स्थानिक गुराखी असतात. या माचीवरुन डावीकडे दक्षिण दिशेला असणाऱ्या हतीच्या सोंडेसारख्या आकाराच्या चिंचोळ्या गडमाथ्यावरुन आपला थरारक प्रवास सुरु होतो. त्यातच हा प्रवास जर पावसाळ्यातील असेल तर... पावसाळ्यात पावसाच्या येणाऱ्या सरी, दोन्ही बाजूला असणारे धुके, धुक्यातून दिसणारा भंडारदरा जलाशय, सह्याद्री पर्वतरांगेतील शिखरांची टोके सर्वकाही नि:शब्द करुन टाकणारे. या सोंडेच्या वाटेने गडप्रवास करताना लहान लहान कातळटप्पे पार करत एका लहानशा पण उंच टेकडीवर आपण पोहोचतो. येथे या लहानशा माथ्यावरही तांदळा दिसून येतो. येथुन कळसूबाई पर्वत रांगेतील दिसणारी अनेक शिखरे, तालुक्यातील प्राकृतिक चमत्कार असलेला चेमदेव सुळका हे अगदी ठेंगणे वाटतात. या टेकडीवर थोडा आराम करत समोर दिसणारा कातळटोपीचा डोंगर उंच कडा असलेला हा डोंगर पुढे चिंचोळा व मागे रुंद असा टोपीसारखा भासतो. या डोंगराकडे जाणाऱ्या वाटेने पुढे जावे. येथेच तेरुंगणवरुन येणारी गडवाट गडावर येऊन मिळते. या कातळटोपी डोंगराच्या उजवीकडील उंच कड्याखालून जाणाऱ्या अरुंद कडेवाटेने पुढे जावे. उजवीकडील खालील बाजूला असलेले गर्द कारवीचे जंगल व डावीकडील बाजूला डोक्यावर झेपावणारा उंच कातळकडा आपल्याला थरारक ट्रेकचा अनुभव करुन देतात.
कातळटोपी डोंगराच्या कड्याखालून पुढे गेल्यावर पाबरगडाच्या पायथ्याच्या वाटेजवळ आपण पोहोचतो. पाबरगड व कातळटोपी डोंगराच्या मधल्या नळीवाटेने डावीकडे थोडे वरती चढल्यावर पुन्हा उजवीकडील पाबरगडाच्या कातळकड्यावरुन चढावे. येथील अवघड कातळटप्पा थोडा काळजीपूर्वक चढावा. या कातळकड्यावरुन चढताना कातळावर असलेल्या कोरीव खाचा व हातांची पकड मजबूत ठेवावी. येथेच एक उंच कातळटप्पा आहे. मात्र दगड रचून येथे पायऱ्या केल्या आहेत. थोडे वरती गेल्यावर पुन्हा कातळात कोरलेल्या पायऱ्या व खोबण्यांच्या आधाराने हा टप्पा पार करत पुन्हा कारवीच्या घनदाट जंगलातून आपला प्रवास सुरु होतो. कारवीच्या या गर्द झाडीतील अरुंद गडवाटेने जात असताना तुम्ही जर सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये प्रवास करत असाल तर या अरुंद वाटेच्या कडेने असंख्य रानफुले आपले स्वागत करताना आपल्याला मोहित करुन टाकतात व आपला अवघड गडप्रवास कधी सोपा बनतो ते समजतही नाही. रानफुलांच्या स्वागताच्या या आल्हाददायी भावनेत आपण पुन्हा एकदा एका कातळटप्प्याखाली येऊन पोहोचतो. येथे समोर दिसणाऱ्या कातळटप्प्यावर जाणारी एक कातळवाट, तर उजवीकडे कातळकड्याखालून जाणारी दुसरी रानवाट आहे. प्रथम कड्याखालून जाणाऱ्या या रानवाटेने जाये. थोडेसे पुढे गेल्यावर डावीकडे कडेकपारीत एक मोठी नैसर्गिक गुहा आहे. या गुहेच्या कातळावर 'पर्यटक निवास गुंफा' असे लिहिले आहे. गुहेत गेल्यावर गुहेची भव्यता लक्षात येते. ५०-६० माणसे सहज राहू शकतील अशी ही विस्तीर्ण नैसर्गिक गुहा. या गुहेतही कोरीवकामातील एक अर्धवट पाणीटाके आहे मात्र त्यात उन्हाळ्यात पाणी नसते. पावसाळ्यात संपूर्ण गुहेत ओलावा असतो. या गुहेच्या पुढील बाजूलालगतच दुसरी एक नैसर्गिक गुहा आहे. या गुहेत मात्र पाणी आहे. अतिशय थंडगार अन स्वच्छ पाणी असलेल्या या गुहेत बाराही महिने एकाच पातळीत पाणीसाठा असतो. विशेष म्हणजे दोन्ही गुहा शेजारीच असतानाही एक गुहा कोरडी तर दुसरी बारामाही पाणी साठा असलेली. यामुळे दुर्गप्रेमी पर्यटक या गुहेत राहणे पसंत करतात. पाणीसाठा असलेल्या या गुहेत कातळावर एक शिवलिंग व एक नंदी यांचे कोरीव शिल्प आहे. स्थानिक लोक बहिरोबा दर्शनाला जाण्या अगोदर या शिवलिंगावर पाणी वाहतात व नंतरच गडावरच्या बहिरोबा दर्शनासाठी जातात. प्रकृतीचे हे वैभव बघत पुन्हा माघारी यावे आणि कातळकड्याच्या वाटु' प्रवास सुरु करावा. गडाचा सर्वात अवघड कातळकडा उंच आणि तीव्र उताराच्या या टप्प्यावरुन चढताना हातपाय थरथरतात. ट्रेकचा थरार येथे अनुभवयास मिळतो. यावेळी खालील दिशेला दिसणाऱ्या तीव्र उताराकडे न बघता पायाची स्थिती व हाताची पकड याकडे लक्ष द्यावे. अंतर ठेवून चालावे.
तालुक्याच्या सह्याद्री पर्वतरांगेतील प्रत्येक डोंगर हा इतिहासाचा साक्षीदार आहे. ऐतिहासिक, धार्मिक पाऊलखुणा असलेले हे सर्व वैभव बघत असताना इतिहास अभ्यासक व दुर्गप्रेमी यांना अनेक अनुभव येत असतात. या भागातील सर्व गडकिल्ले बघितल्या नंतर या गडावरच्या या शेवटच्या टप्प्याचा अनुभव मात्र खूप वेगळा होता. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, अति प्राचीन हरिश्चंद्रगड, दुर्गवैभव असलेला रतनगड, अति अवघड श्रेणीचे अलंग-मदन-कुलंग हे सर्व ज्ञात असलेले गडकिल्ले, यातील सर्व गडकिल्ल्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या आहेत. वनपर्यटन विभागाने लोखंडी रेलिंग व शिड्यांच्या माध्यमातून सोपे व सुरक्षित पर्यटन केले आहे. ए. एम. के. या डोंगररांगेवर ट्रेक करताना कातळात कोरलेल्या पायऱ्यांबरोबरच सोबतीला असलेले ट्रेकर्स यामुळे अतिअवघड श्रेणी असूनही हे गडकिल्ले सोपे वाटून जातात. पाबरगडाचे मात्र वेगेळे आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या आधुनिक सुविधा नाहीत. अगदी नगण्य प्रमाणात कातळात कोरीव पायऱ्या वगळता संपूर्ण गडवाट ही निसरडी व मनात धडकी भरवणारी आहे. येथे स्थानिक गाईड केवळ सोबती व गडावरील ठिकाणे माहिती करुन देण्यासाठी येतात. मात्र सुरक्षेच्या सर्व गोष्टी दुर्गप्रेमींनांच सांभाळाव्या लागतात. अतिशय थरारक अनुभव देऊन गेलेला हा गडकिल्ला हरिहर गडापेक्षाही थरारक वाटला. त्यात या गडावर ऑगस्ट महिन्यात जाण्याचा योग आल्याने संततधार पाऊस व धुक्याचे दाट पांघरुण घातलेल्या उंच पर्वतरांगा यामुळे हा प्रवास अविस्मरणीय झाला. खरं तर हा अनुभव खूपच वेगळाहोता. खूप लिहावसं वाटतं पण शब्दांची गुंफण करणे शक्य होत नाही. केवळ नि:शब्द करुन टाकणारा हा प्रवास. हा कातळटप्पा ओलांडताना तालुक्यातील संपूर्ण पर्वतरांगा व त्यांच्या गडवाटा डोळ्यासमोरुन जात होत्या. हा टप्पा चढल्यावर मात्र भिती आणि थकवा क्षणात नाहिसा झाला.
वाऱ्याच्या झुळकेने डोलणारी सोनकीची पिवळी धमक फूले भरभरुन स्वागत करत होती. उन्हाळ्यातही येथे मन शांत करणारा थंड वारा असतो. रानफूलांचे स्वागत स्विकारत डावीकडील कडेवाटेने थोडे पुढे गेल्यास एक लांब आणि मोठे पाणी टाके आहे. या पाणीटाक्याच्या पुढेही एक लहान पाणी टाके आहे. पाऊस, धुके अन रानफूलांची गर्दी यामुळे ही दोन्ही पाणी टाके पाहणे शक्य झाले नाही. ही पाणी टाके पाहून पुन्हा माघारी यावे किंवा उजवीकडील गडमाथ्याच्या दिशेने जाणाऱ्या रानवाटेने जावे. थोडे पुढे गेल्यावर एक दगडी जोते व पाणी टाके आहेत. रचीव दगडांची अर्धवट भिंत असलेल्या या मंदिरात बहिरोबाचा तांदळा ठेवलेला आहे. बाजूलाच गणेशाचे शेंदूर लावलेले कोरीव शिल्प आहे. मंदिराच्य पाठीमागे एकमेकालगत चार कोरीव पाणी टाक्यांची श्रृंखला आहे. या पाणी टाक्याच्या उजवीकडील बाजूने जाणाऱ्या गडवाटेने पुढे जावे. येथेच एक अर्धवट अरुंद व खोल मात्र अर्धवट गाडलेले पाणी टाके आहे. त्यापासून थोडे खालच्या दिशेने जाणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर एक विशाल व खोल पाणी टाके नजरेस पडते. बारामाही पाणीसाठे असलेल्या या पाणी टाक्याच्या कड्याला हनुमानाचे शेंदूर लावलेले भव्य कोरीव शिल्प आहे. या कोरीव हे शिल्पावरुनच या पाणी टाक्याला 'हनुमान टाके' म्हणून ओळखतात. हे हनुमान टाके बघत पुन्हा बहिरोबा मंदिराकडे माघारी परतावे. मंदिरासमोरुन गडमाथ्याकडे एक गडवाट व डावीकडे एक गडवाट जाते. डावीकडील गडवाटेने गेल्यास गडावरील कोरीव कामातील प्रवेशद्वार असलेली बंदिस्त गुफा व पाणी टाके पहावयास मिळेल. पावसाळा असल्यामुळे गडावरचे हे अर्धवट गाडलेले मात्र अप्रतिम कोरीवकाम बघणे शक्य झाले नाही. मात्र गडावरील हे कोरीव काम अतिशय सुंदर व मोहक आहे. माथ्याच्या दिशेने जाणाऱ्या गडवाटेने गडमाथ्यावर गेल्यावर एकमेकांवर रचलेले दगड भिंतीच्या रुपात दिसतात. या रचीव भिंतीच्या मध्ये काही लाकडी मोगऱ्या व शेंदूर लावलेला तांदळा ठेवलेला आहे. स्थानिक याला वेताळ म्हणून पूजतात. येथेच फरशीवर पाबरगडाची समुद्रसपाटीपासून १३४९.५२ मिटर उंची असल्याचे नमूद केले आहे. मात्र समुद्रसपाटीपासून या गडाची उंची ४४३० फूट असल्याचा उल्लेख आहे. या माथ्यावरुन सह्याद्रीचेविशाल रूप अनुभवणे प्रत्येक दुर्गप्रेमीला हवेहवेसे वाटते. रतनगड, ए. एम.के., कळसूबाई या उंच गिरीदुर्गांच्या मध्ये पसरलेला विशाल भंडारदरा जलाशय, पट्टा डोंगररांग व प्रवरा नदीचे संपूर्ण खोरे याचबरोबर दक्षिणेकडील शिरपुंजे - घनचक्कर-गवळदेव ही उंच पर्वतरांग हे सगळं सह्याद्रीचं वैभव या उंच माथ्यावरुन अनुभवता येते. सह्याद्रीच्या या सुंदर भूरुपांची ओळख सहजपणे पटते. खरं तर अकोले भ्रमंती करण्या अगोदर अकोले पर्यटनाची माहिती समजून घ्यायला सर्वात अगोदर याच पाबरगडावर यावे. या गडावरुनच या परिसरातील सर्व गडकिल्ल्यांची माहिती व ओळख सहजपणे होते. ही सर्व भूरूपे न्याहाळत त्यांचा इतिहास आठवत गडाच्या याच रानवाटेने पुढे दक्षिणेकडे जावे. येथुन खाली पाहिल्यानंतर दगड रचलेली काही जोती दिसून येतात. या दिशेने खाली निसरड्या वाटेने हळुवारपणे खाली जावे. पावसाळ्यात या ठिकाणी आपोआप नकळतपणे आपल्याला घसरगुंडीचा अनुभव मिळतो. तीव्र उताराच्या या गडवाटेने खाली आल्यावर येथे मोठ्या आकाराची दोन कोरीव पाणी टाकी आहेत. ती बघत तेथेच शेजारी पश्चिमेकडील बाजूलाही अशीच दोन मोठी कोरीव पाणी टाकी आहेत. हे सर्व कोरीव पाणी टाकी बघत पुन्हा आल्या वाटेने माघारी फिरावे.
पाबरगडाची उंची व गडकिल्ल्यांच्या मध्यावर असलेले स्थान लक्षाय घेता या गडाचा इतिहासही तितकाच पराक्रमी असावा हे गडावर गेल्यावर लगेच लक्षात येते. येथे पिण्यासाठी असलेले मुबलक कोरीव पाणी टाके, गडावर असलेल्या प्राकृतिक मोठ्या गुहा, कोरीव कामातील गुफा हे सर्व दुर्गवैभव पाहून हा गडही आदिवासींच्या पराक्रमी इतिहासाचा साक्षीदार असावा यात तिळमात्र शंका नाही. आज अनेक गिरीदुर्गांची नव्याने ओळख होत असताना त्यांचा इतिहासही शोधुन काढला जातो. मात्र हा राकट दुर्ग अजुनही दुर्लक्षित आहे. सहजासहजी लक्षात न येणाऱ्या या दुर्गाचे प्राचीन महत्व किती असावे हे सांगायला नको. गडाविषयीची माहिती मिळवत असताना पाबरखिंडीचा उल्लेख आढळतो. ब्रिटिशकाळात राजूर-तेरुंगण-मुतखेल- रतनगड असा पूर्वीची मार्ग होता. तेरुंगण व मुतखेल यांना जोडणारा मार्ग पाबरगडाच्या दक्षिणेकडील खिंडीतून होता ज्याला नळीची वाट म्हणुन ओळखतात. इ.स. १८२० मध्ये रतनगडावर झालेल्या ब्रिटिश व कोळी महादेव यांच्या लढाईत किल्लेदार गोविंदराव खाडे यांचे चिरंजीव बालवीर कृष्णा खाडे यांना वीरमरण आले. यावेळी वीर कृष्णा खाडे यांची पत्नी व रामजी भांगरे यांची मुलगी आदिवासी वीरांगणारुक्मिणी खाडे यांनी या खिंडीत ब्रिटिशांना अडविले. ब्रिटिश अधिकारी मॅकिन्टोश याने रतनगड जिंकत रामजी भांगरे व गोविंदराव खाडे यांना अटक करुन फौजेसह राजूरच्या दिशेने जात असताना आदिवासी वीरांगणा रुक्मिणीबाई खाडे हिने याच पाबरगडाच्या खिंडीत नेम धरत कॅप्टन मॅकिन्टोशचे सहकारी पीर व पिटर यांना आपल्या बंदूकीचा निशाणा बनविले. यावेळी कॅप्टन मॅकिन्टोश कसाबसा वाचला मात्र ब्रिटिश बंदूकीतून निघालेल्या गोळीने या आदिवासी वीरांगणेचा वेध घेतला. आज याच खिंडीशेजारच्या पाबरगडावरुन वाहणाऱ्या धबधब्यांना स्थानिक 'रुक्मिणीबाई खाडे वॉटर फॉल' म्हणुन ओळखतात. अलिकडच्या काळातील हा इतिहास निसर्गवासी निवृत्तीबाबा धोंगडे यांच्या संशोधनातून सर्वांसमोर आला. मात्र त्यापूर्वीच्या इतिहासावर अजुनही संशोधन होणे गरजेचे आहे. इतिहास संशोधनाबरोबरच दुर्गप्रेमी व इतिहास अभ्यासक यांच्या सुरक्षेसाठी गडावर अतिअवघड ठिकाणे रेलिंग व लोखंडी शिड्यांची व्यवस्था करणेही तितकेच महत्वाचे आहे. जे दुर्गप्रेमी व इतिहास अभ्यासक या गडावर ट्रेक करुन आले आहेत ते या गडाचा उल्लेख पाबरगड नव्हे तर पहाबरगड म्हणुन कुतुहलाने करतात.
लेखन : श्री. अरविंद सुभाष सगभोर ( M.A.History )
संपर्क : 7218663377
ई-मेल : arvind@bhatkya.in