समुद्रसपाटीपासून ४३०० फूट उंच...गॅझेटमधील नोंदीनुसार हा किल्ला १७६३ साली महादेव कोळी सरदार जावजी यांनी प्रथम ताब्यात घेतल्याची नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजूर, अलंग, सोकुर्ली, वाडी परगण्याची व जूरुश्रोश्री परगण्याची या पाच विभागांची एकूण २०० खेड्यांचे हे मुख्यालय होते. साठ-सत्तर फुटांचा कडा लोखंडी शीड्यांच्या माध्यमातून चढल्यानंतर रतनगडाचा मुख्य रखवालदारदरवाजा लागतो. याच दरवाज्यातून गडावर प्रवेश केला जातो. रखवालदार दरवाजाच्या उजवीकडे रत्नाई देवीची एका कोरलेल्या विस्तृत गुहेतील मूर्ती आहे. रत्नाई देवीच्या पुढील भागात गुहा कोरलेल्या आहेत. या ठिकाणी पर्यटक पावसाळ्यामध्ये टेंट लावून मुक्काम करतात. रखवालदार दरवाजाच्या डाव्या बाजूला किल्ल्याच्या दक्षिण दिशेला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यावर अनेक प्राण्यांची व देवतांची चित्रे कोरलेली आहेत. हा दरवाजा ओलांडल्यावर डावीकडे खालील बाजूस कडेलोट पॉईंट आहे. उजवीकडून वरच्या दिशेला राणीचा हुडा (भग्न झालेला बुरुज) व शेजारी पाण्याचे टाके आहे. येथूनच पुढे पश्चिमेला पाण्याचा मोठा हौद /टाके आढळते. राणीच्या हुडापासून शिखराकडे वरच्या दिशेला बालेकिल्ला आहे. या सर्व परिसरात नवरात्रीत सोनकीच्या रानफुलांची सोनेरी चादर पांघरलेली असते. सकाळच्या कोवळ्या उन्हात हे दृश्य पाहण्याचे सुवर्ण भाग्य यावेळी लाभते. रतनगडाचा पश्चिम भाग अतिशय देखणा व उंच वाटतो, कारण खालील भागात उंच कोकणकडा आहे. त्यामुळे या भागातून संपूर्ण कोकण दर्शन होते. याठिकाणी पाण्याचे मोठे हौद दिसतात. मात्र ते केवळ हौद नसून, आतमध्ये अंधार कोठडी आहे. किल्ल्याच्या आतील हा भाग पावसाळ्यात पाण्याने भरल्यामुळे निदर्शनात येत नाही. मात्र उन्हाळ्यात आत मध्ये अंधार कोठडी किंवा डोंगरात कोरलेल्या गुहा यांचा अंदाज येतो.
थोडे पुढे गेल्यावर कोकण दरवाजा हा फसवा दरवाजा आहे. यास चोर दरवाजा असे म्हणतात. या ठिकाणी नष्ट झालेला रस्ता आहे. कदाचित या दरवाजातून पळून जाता वेळेस पळून जाणारा सरळ कड्यावरून खाली जावा, अशा प्रकारची फसवी योजना या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध केलेली आढळते. पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात. तसेच डोंगरात जाण्यासाठी छोटेसे खिडकी सारखे कोरीवकामही दिसते. मात्र ते नैसर्गिक रित्या बंद झालेले आहे. अतिशय उत्कृष्ट व योजनाबद्ध रचना.....
गडावरील नेढे व बालेकिल्ला....
रतनगड किल्ल्यावरील ही उंच ठिकाणे.
नेढे म्हणजे डोंगराला असलेले सुईसारखे छिद्र /खडकातील भोक. अशा प्रकारचे नेढे अनेक डोंगरांवर आपल्याला पहावयास मिळतात. ही बहुतेक नेढे निसर्गनिर्मित असतात, मात्र या ठिकाणचे नेढे जरी निसर्गनिर्मित असले तरी त्यावर थोड्या फार प्रमाणात कोरीव काम केल्याचे आढळून येते. गडाच्या माथ्यावर २०फूटx१४फूट आकाराच्या इमारतीचे एक जोते दिसते. येथे पूर्वी महाल/ वस्ती असावी व येथून गडाच्या चारही बाजू वर नजर ठेवली जात असावी. याला बालेकिल्ला असे म्हणतात. रतनगडाच्या चारही दिशेला वैशिष्ट्यपूर्ण या प्रवेशद्वारांची रचना केलेली आहे. त्यातील हा उत्तरेकडील त्रिंबक दरवाजा. या दरवाजाला कातळात कोरलेल्या दोनशेपेक्षा अधिक कोरीव पायऱ्या आहेत. ज्या सहजासहजी लक्षात येत नाहीत. साम्रद- घाटघर या दिशेकडून येण्याचा तसा हा गडावरील सोपा मार्ग. येथून उजवीकडे वळण घेतल्यानंतर पुन्हा रत्नाई देवीच्या गडदे च्या वरील मार्गाने आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे येतो. मात्र याठिकाणी मध्येच प्रवारा माई चे उगमस्थान आहे. जेथे एक दगडात कोरलेली महादेवाची पिंड आहे. तेथेच खऱ्या अर्थाने प्रवरा नदिचा चा उगम मानला जातो. गडाचा इतिहास उपलब्ध होत नाही. मात्र हा सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचे काळातील बांधणीचा वाटतो.
(संदर्भःप्रवराकाठची संस्कृती, नारायण गंधे, पान नं.११२)
एकंदरीतच या अतिशय निसर्ग समृद्ध आणि ऐतिहासिक वारसा तसेच आदिवासी शौर्याची परंपरा लाभलेल्या या गडाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा एवढी यानिमित्ताने अपेक्षा...
लेखन : श्री. अरविंद सुभाष सगभोर ( M.A.History )
संपर्क : 7218663377
ई-मेल : arvind@bhatkya.in