अकोले शहरातील सिध्देश्वराच्या मंदिराच्या पश्चिमेकडे असलेल्या मॉडर्न कॉलेजच्या पश्चिमेकडे असलेले हे पेशवेकालीन मंदिर. हे मंदिर खाजगी मालकीचे आहे. अतिशय छोट्या रस्त्यातील मार्गाने असलेल्या पेठेतील एक गल्लीत एवढे कोरीव आणि विशाल मंदिर असेल अशी आपण कल्पनाही करु शकत नाही.
अतिशय कोरीव सुबक शिवलिंग, विस्तीर्ण सभामंडप, आकर्षक कोरीव कामातील खांब यामुळे या मंदिराला अवश्य भेट द्यावी. मंदिर मालकांच्या पूर्वपरवानगीने पाहता येते. कोरीव दगडांच्या कलाकृतीतून साकारलेले हे मंदिर खुपच आकर्षक आहे. इ.स. १७८२ मध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचा उल्लेख आढळतो. मजबूत व सुंदर खांबांवरील गोलाकृती सभामंडप्पाचे विलोभनीय रुप डोळ्याचे पारणे फेडते. मॉडर्न कॉलेजपासून चाफ्याच्या उंच झाडातून मंदिराचे तीन कळस दुरुनच डोकावताना दिसतात. उंच व दगडी भिंत असलेल्या या मंदिराला उत्तर दिशेला एक लहानसे बंदिस्त प्रवेशद्वार आहे. येथुन पुढे गेल्यावर डावीकडे वळत पश्चिम दिशेला असलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वाराने मंदिरात प्रवेश करता येतो.
मंदिरात प्रवेश करताक्षणी आपल्या नजरेत पडते ते गजशिल्प. मंदिराच्या मुख्य गर्भगृहाचा तळ हा या गजशिल्पांच्या योजनेमुळे जणुकाही हे मंदिर पेलल्यासारखे वाटते. गर्भगृहाच्या या पीठाला या नऊ गजशिल्पांनी तोललेले आहे. ही शिल्पे बघत आपण पश्चिमेकडूनच मुख्य मंडपात प्रवेश करतो. आकर्षका गोलाकार छत व त्यात उलटे लटकलेले कमलपुष्प अतिशय मोहक वाटते. मोहक वाटणारे हे कमलपुष्प पेशवेकालीन स्थापत्याची ओळख करुन देते. या मंदिराचा मुख्य मंडप अतिशय भव्य व कोरीव कामातील खांबांवर तोललेला आहे. या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे या मंदिराचे खांब हे चार खांब एकत्रित करुन तयार केलेले आहेत. मंदिराला असे चौदा खांब आहेत. मंदिरात गेल्यावर हे मंदिर पूर्वमुखी असल्याचे समजते. उत्तरेकडून दगडी भिंतीला असलेले बंद असलेले प्रवेशद्वारच मंदिरात येण्याचा मुख्य मार्ग असल्याचे दिसते. पूर्वेकडून मंदिराचा मुख- अर्ध मंडप, अर्धमंडपानी र मुख्य मंडप जो अत्तिशय कलाकृतींनी संपन्न व आकर्षक आहे. मुख्य मंडपाच्यपुढे अंतराळ आहे. या अंतराळातच कोरीवकामातील नंदी पेशवेकालीन स्थापत्याची ओळख करुन देतो.अंतराळाच्या पुढे गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर असलेले शृंगारीक कोरीव काम अप्रतिम आहे. गर्भगृहातील शिवलिंगाचे दर्शन घेत व अंतराळातील नंदीवर नजर फिरवत पुन्हा मुख्य मंडपात यावे. मुख्य मंडपाच्या आठही दिशा वैशिष्ट्येपूर्ण आहेत. मुख्य चार दिशेंपैकी पूर्वेला अर्धमंडपाची कमान, पश्चिमेला अंतराळाची कमान व उत्तर-दक्षिणेलाही याच प्रकारच्या कोरीव कमानी लक्ष वेधून घेतात. चारही उपदिशेंना खांबांच्या केलेल्या आकर्षक रचनेमुळे उपदिशेंची कोनातील ही रचना अतिशय सुरेख व लक्षवेधी वाटते.
मंदिराच्या अंतर्भागाइतकाच आकर्षक व लक्षवेधी असा मंदिराचा बाह्यभागही आहे. मंदिराच्या बाह्य भागात शाईल, पोपट, हत्ती, माकडे या विविध दगडी शिल्पांनी मंदिर कौशल्यात जिवंतपणा आणला आहे. मंदिराच्या बाह्य भागात मंडपावरील कोपऱ्यात व शिखरावरील कोरीवकामात गजशिल्पांचे आकर्षक रचना दिसून येते. फुलदलांचे कोरीवकाम अतिशय सुरेख आहे, मंदिराच्या आवारातून मंदिराचे कळस मात्र पूर्ण नजरेस येत नाहीत. मंदिराच्या आतील व बाहेरील प्रत्येक कानाकोपऱ्यात व भिंतीवर कोरीव, रेखीव व सुंदर नक्षीकाम केलेले आहे. कमलदल, पाकळ्या व फुलांचे दगडी कोरीव काम फारच आकर्षक आहे. मंदिराच्या शिखरावरील तिन्ही बाजूला महादेवाच्या ध्यानस्थ मुद्रा शिखराला अधिक मोहक बनवितात. महादेवाच्या ध्यानस्थ मुद्रेच्या खालील बाजूस कोरीव कामातील मूर्ती विरहीत कोष्टके आहेत. मंदिराच्या तिनही शिखरावरील कोरीवकाम एका नजरेत पहावयाचे असल्यास मंदिराशेजारील इमारतींच्या छतावर जावे लागते. छतावरुन मंदिराचे दिसणारे कळस अतिशय मोहक व आकर्षक दिसतात. खाजगी मालकीत व बाजारपेठेतील इमारतींच्या विळख्यात आणि अरुंद रस्त्याच्या कडेला आजही मजबूत स्थितीत असणारे आधुनिक इतिहासाच्या सुरुवातीच्या काळातील हे दगडी कोरीव कामातील मंदिर बांधकाम अनेक कारणांमुळे वैशिष्ट्येपूर्ण आहे.
लेखन : श्री. अरविंद सुभाष सगभोर ( M.A.History )
संपर्क : 7218663377
ई-मेल : arvind@bhatkya.in