अकोले तालुक्याचा पश्चिम भाग पट्टा डोंगररांग ते हरिश्चंद्र -बालाघाट डोंगररांगा पर्यंतचा हा संपूर्ण भाग अनेक उंच शिखरांनी व डोंगररांगांनी सजलेला नटलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे याच डोंगर रांगांतून वरती डोकावणारे शिखर होय. सह्याद्रीच्या या डोंगर रांगांतील शिरपुंजाचा बहिरोबा अर्थात भैरवगड, घनचक्कर डोंगर व गवळदेव डोंगर ही डोंगररांग सह्याद्रीतील सर्वात उंच डोंगररांग होय. अकोले तालुक्याच्या पश्चिम दिशेला उत्तर -दक्षिण सह्याद्रीची एक डोंगररांग आहे. याच सह्याद्रीच्या डोंगर रांगेला पूर्व पश्चिम जोडणाऱ्या तीन डोंगररांगा आहेत. यामध्ये पट्टा डोंगररांग जी अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या डोंगर रांगेत औंढा, पट्टा, बिताका या किल्ल्यांचा समावेश होतो. ही रांग तालुक्याच्या उत्तर दिशेला आहे. तालुक्याच्या दक्षिण दिशेला अहमदनगर व पुणे जिल्हा हद्दीवर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे. या डोंगर रांगेत हरिश्चंद्रगड, कोंबाड किल्ला, कुंजरगड यांचा समावेश होतो. तालुक्याच्या मध्यभागात एक डोंगररांग आहे.. या डोंगररांगेमुळे तालुक्याचे दोन भाग पडतात. या डोंगररांगांमुळेच तालुक्याचे मुळा खोरे व प्रवारा खोरे असे दोन मुख्य भाग पडलेले आहेत. याच डोंगर रांगेत सह्याद्रीतील ही उंच शिखरे आहेत. ज्यामुळे ही डोंगररांग सह्याद्रीतील सर्वात उंच डोंगर रांग म्हणून ओळखली जाते. या डोंगर रांगेतील भैरवगड हाच केवळ भैरोबा देवस्थानामुळे परिचित गड आहे. मात्र दुर्ग भटकंती करणाऱ्या पर्यटकांनी या दोन उंच डोंगररांगांना त्यांच्या उंचीचा सन्मान ओळख मिळवून दिला आहे. आज या डोंगराच्या दिशेने पर्यटकांची पावले आपोआप वळतात. विशेषतः पावसाळ्यानंतर येथे भटकंती करणे पर्यटकांना जास्त आवडते. या डोंगर-रांगांवरून आपल्याला तालुक्याच्या मुळाखोरे व प्रवारा खोरे या दोन्ही नदी खोऱ्यांचे दर्शन होते. तालुक्यातील प्राकृतिक सौंदर्याची उंची वाढविणार्या ह्या उंच डोंगररांगा. याच डोंगर रांगेतील सुरुवातीचा व सर्वपरिचित किल्ला म्हणजे शिरपुंजाचा भैरवगड होय.
अकोले तालुक्याच्या सह्याद्री डोंगर रांगेतील एक वैभव संपन्न व आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेला गिरीदुर्ग. अकोले - राजुर -सावरकुठे मार्गे 35 किमी प्रवास केल्यानंतर आपण शिरपुंजे या गावी पोहोचतो. शिरपुंजे गावात पोहोचल्यानंतर समोर डावीकडे एक डोंगररांग दिसते. डोंगर रांगे कडे काळजीपूर्वक बघितल्यावर गडावर फडफडणारे झेंडे दिसतात. याच फडफडणाऱ्या झेंड्यांकडे बघत आपल्याला हा गड प्रवास करावा लागतो. प्रथम आपण वाटेवरच्या कमानीतून गड वाटेने गड चढण्यास सुरुवात करतो. या ठिकाणी ही गडवाट वृक्षांनी वेढलेली आहे. गर्द वृक्षांतून डोंगर प्रवासाची सुरुवात ही अल्हाददायक वाटते. गड वटेने पुढे गेल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. अलीकडे कोरलेल्या या पायऱ्यांमुळे गडावर चढण्यासाठी सोपे जाते. यानंतर अरुंदवाटेने गडाच्या दिशेने जावे लागते. या ठिकाणीही संरक्षणाच्या दृष्टीने वनविभागाने संरक्षक कठाडे उभारलेले आहेत. त्यामुळे या कठाड्यांच्या आधारे आपल्याला गड चढणे करणे सोपे जाते. अरुंदवाट व संरक्षक कठाडे यातून आपण शिरपुंजे गड व घनचक्कर डोंगर या दोन्ही डोंगरांच्या मधील खिंडीमध्ये पोहोचतो. पूर्वी हा प्रवास अतिशय आव्हानात्मक व खडतर होता. मात्र अलीकडच्या काळात उपलब्ध केलेल्या सोयी व सुविधांमुळे हा अवघड प्रवास आता सहज बनवला आहे. याच खिंडीच्या बाजूने आपण घानचक्कर डोंगरावरही चढू शकतो. या खंडीतच आंबित या गावातून भैरवगडावर येणारा रस्ताही येऊन मिळतो. येथूनच भैरवगडावरील खऱ्या थरारक प्रवासाला सुरुवात होते. या खिंडीतून शिरपुंजे भैरवगड चढत असताना सुरुवातीलाच गोलाकार कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पूर्वी या ठिकाणी चढाई करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन चढण्यासारखे होते. मात्र आता वन विभागाने या ठिकाणी अतिशय सुरक्षित कठडे केल्यामुळे हा टप्पा अगदी सोपा झाला आहे. या गोलाकार कातळ पायऱ्या चढून गेल्यावर गडावरच्या उध्वस्त झालेल्या तटबंदीचे व प्रवेशद्वाराचे अवशेष दिसून येतात. सुमारे साडेतीन हजार फूट उंचीच्या या गडावर उजवीकडे चार पाणी टाके व पुढे एक अस्ताव्यस्त कोरडे टाके दिसते. या टाक्याच्या थोडे पुढे डाव्या बाजूला कातळात कोरीव खांब असलेले पाणी टाके दिसते. यालाच जलकुंभ असे म्हणतात. या टाक्याकडे जाण्यासाठी ची वाट ही कातळात कोरलेली आहे. या पाणी टाक्यावर झाकण करण्याची व्यवस्था केलेली आहे. पाणी टाक्याच्या आतही एक बंदिस्त पाणी टाके आहे. याच टाक्याचे पाणी वर्षभर पिण्यासाठी वापरतात. अतिशय थंड व शुद्ध पाणी या ठिकाणी बाराही महिने उपलब्ध असते. याच खडकावर काही रांजणखळगेही दिसून येतात. हे सर्व बघत पुढे जाताना पुन्हा चार पाणी टाकी व नंतर पुन्हा पाच पाणी टाके दिसतात. या ठिकाणी शेजारीच एक मोठी गुहा आहे. या कोरीव गुहेचा उपयोग पर्यटकांना व स्थानिकांना राहण्यासाठी होतो. गुहेच्या समोरच बाहेरील बाजूला एक उंच विरघळ आहे. त्यावर काही प्रसंग व देवतांची चित्रे कोरलेली आहेत. गुहेच्या पुढील बाजूलाही एक विरगळ आहे त्या वीरगळी शेजारील दोन मुर्त्या दिसून येतात. येथून काही पायऱ्या उतरून आल्यावर आपण भैरवनाथाच्या गुहेत येतो. या गुहेचे दोन भाग असून यातील एका भागात भैरवनाथाची अश्वारूढ मूर्ती आहे. तर दुसऱ्या भागात स्वयंपाकासाठी उपयोगी भांडी व चूल मांडलेली दिसून येते. येथे गावकऱ्यांना व पर्यटकांना राहण्याची उत्तम जागा आहे. गडावरचे सर्व धार्मिक कार्य या ठिकाणीच केले जातात.
भैरवनाथाच्या या गुहे समोरून डाव्या बाजूने आपल्याला गडाच्या माथ्यावर जाता येते. यावेळी थोडे गडमाथ्याच्या वाटेने पुढे गेल्यास समोर पाण्याचे मोठे टाके दिसते. या पाणी टाक्याच्या वरील बाजूलाच कातळात कोरलेल्या दोन मोठ्या गुहा आहेत. त्यातील एका गुहेला मोठी कमान आहे. दुरून गुहे सारख्या आकाराच्या दिसणार्या या कोरीव कामात जवळ गेल्यानंतर मात्र पाणी साठलेले आढळून येते. ही कोरीव गुहा नसून गुहेसारखे दिसणारे बंदिस्त व विशाल पाणी टाके आहे. या पाणी टाक्याचे दोन भाग दिसतात. डावीकडील बाजूला खोल खोदीव पाणी टाके नितळ व स्वच्छ पाण्याने भरलेले आहे. मात्र उजवीकडील बाजू गुहेसारखी जाणवते या ठिकाणी पर्यटकांनी किंवा स्थानिकांनी मुक्काम केल्याच्या काही खुणाही आढळून येतात. हे विशाल व बंदिस्त पाणी टाके बघत गडमाथ्याच्या दिशेने वरती गेल्यानंतर गडाचा अरुंद माथा व स्वभोवतालता विस्तीर्ण परिसर डोळ्याचे पारणे फेडतो. अरुंदमाथ्यावरही खोदीव पाणी टाके श्रृंखला दिसून येते. येथेही बऱ्याच प्रमाणात पाणी टाके आहेत. येथून माघारी येताना येथे माथ्यावरच फडफडणारा ध्वज व तांदळा दिसून येतो. या तांदळाच्या बाजूलाही माथ्यावर गारव्याच्या खुणा आढळतात. येथून दक्षिणेकडे पाहिल्यास कलाडगड व हरिश्चंद्रगड डोंगररांग दिसून येते.
भैरवनाथाच्या वरच्या दिशेने खाली आल्यास येथेही एका मोठ्या कातळावर आडवे विशाल पाणी टाके दिसून येते. येथून आपण पुन्हा पाच पाणी टाक्यांच्या श्रृंखलेजवळ पोहोचतो. येथून भैरवनाथ मंदिराकडे न जाता डावीकडील दिशेने पुढे आल्यास आपण पुन्हा जलकुंभा पाशी पोहोचतो. गडाचा इतिहास जरी उपलब्ध नसला तरी गडावरची सुरक्षित व बंदिस्त पाणी टाके, राहण्यासाठी कातळात कोरीव भव्य व सुरक्षित गुहा या बरोबर असंख्य खोदिव व आकाराने लहान-मोठी असलेली अनेक पाणी टाकी यावरून या गडावर प्राचीन काळी मोठ्या प्रमाणात निवास असावा हे सहज लक्षात येते. गडाभोवती सभोवताली कातळ कडा असल्याने गडावर सहजासहजी पोहोचता येत नाही. हरिश्चंद्रगड वाटेवरती असलेला हा गड ऐतिहासिक दृष्ट्या खूपच महत्त्वाचा असावा, असे सहज लक्षात येते. मात्र आज हा गड आपले ऐतिहासिक अस्तित्व शोधत उभा आहे. गडाच्या सुरुवातीचे घडीव दगडातील रचीव प्रवेशद्वार गडाच्या इतिहासाचा प्रथम साक्षीदार आहे. मात्र आज हा गड फक्त बहिरोबा देवस्थानामुळे पर्यटक व पंचक्रोशीतील जनतेला ज्ञात आहे. असा हा आपल्या संपन्न ऐतिहासिक वैभवासह सह्याद्रीच्या माथ्यावर उभ्या असलेल्या गडावरच्या भैरवनाथाची दरवर्षी अश्विन महिन्यात मोठी यात्रा असते. यावेळी नवस फेडण्यासाठी महिला भाविक या भैरवगडावर आपल्या मोकळ्या केसांनी संपूर्ण गडवाट झाडत गडावर जातात. अतिशय रोमहर्षक असलेला व आगळावेगळा यात्रोत्सव पहाण्यासाठी व हा रोमहर्षक अनुभव घेण्यासाठी पंचक्रोशीत अनेक भाविक या गडावर या यात्रोत्सवात सहभाग घेतात. इतिहासात भैरव गडाचा स्पष्ट उल्लेख आढळत नसला तरी गडावरील काही ऐतिहासिक कोरीव काम व तडबंदीचे अवशेष यावरून हा गड संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असावा. पाबरगडावरून येणारी वाट याच गड पायथ्यापासून पुढे हरिश्चंद्रगड व कुंजर गडाच्या दिशेने जाते. सह्याद्री गड प्रवासातील हा मध्यावरचा व महत्त्वाचा किल्ला किंवा टेहाळणी किल्ला म्हणून इतिहासात याचे महत्त्व या गोष्टीमुळे सिद्ध होते. सह्याद्रीतील गडावर भ्रमण करताना सगळ्यात महत्त्वाची खूण म्हणजे तेथे वेगवेगळ्या प्रकारची कोरीव पाणी टाके व गुहा दिसून येतात. शिरपुंजे गड हा विस्ताराने छोटा गड आहे. मात्र या छोट्याशा गडावर 23 कातळात कोरीव पाणी टाकी दिसून येतात. यावरून या गडाचे महत्त्व लक्षात येते. ही कोरीव पाणी टाकी पाणी पिण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कातळात कोरीव टाक्यांनी संपन्न व स्थानिकांचे श्रद्धास्थान असलेला असा हा दुर्ग भैरवगड.
भैरव गडाच्या लगत असलेला दुसरा पर्वत शिखर म्हणजे घनचक्कर डोंगर होय.कळसुबाई, साल्हेर, गवळदेव यानंतर चौथ्या क्रमांकाचा घनचक्कर. सह्याद्री मध्ये अनेक उंच शिखरे आहेत. मात्र एकाच डोंगर रांगेत भैरवगड, गवळदेव व घनचक्कर या तिन्ही उंच शिखरांचा समावेश होतो. सह्याद्रीतील ही सर्वात उंच डोंगररांग होय. शेजारी असलेल्या या त्रिकुटामुळे सह्याद्रीतील त्यांचा दबदबा नक्कीच वाढतो. शिरपुंजे भैरवगडाच्या खिंडीजवळ गेल्यावर दोन वाटा फुटतात. यातील पहिली उजवीकडील वाट ही घनचक्कर व गवळदेव डोंगराकडे जाते. तर दुसरी डावीकडील भैरवगडावर जाते. या ठिकाणी उजवीकडच्या डोंगर माथ्याकडे पाहिल्यास वनविभागाने केलेले रेलिंग दिसते. या रेलींगच्या दिशेने तीव्र चढाई करत वरती गेल्यास आपण घनचक्कर डोंगराच्या माथ्यावर पोहोचतो. येथील दिसणारे सह्याद्रीचे विलोभनीय रूप डोळ्यांचे पारणे फेडते. घनचक्कर डोंगरावरून भैरवगड एकाच टप्प्यात दिसतो. भैरवगडाचा संपूर्ण माथा या डोंगरावरून दृष्टीस पडतो. दुसरा मार्ग उजवीकडे कातळकड्याखालून जातो. यावेळी उजव्या बाजूने कातळकड्या खालून आपला घनचक्कर डोंगररांगेतील प्रवास सुरू होतो. कातळकड्या खालून जाताना डावीकडील एक कातळ कपारीतील भव्य नैसर्गिक गुहा दिसून येते. या ठिकाणी गुहे समोर दगडी भिंत घातलेली दिसते. गुहेत निवासाच्या खुणा दिसून येतात. कदाचित या ठिकाणी पर्यटक विश्रांती किंवा निवास करत असावेत. ही गुहा बघत तसेच कातळकड्याखालून पुढे जावे. पावसाळ्यात येथून गेल्यास समोर अर्ध गोलाकार कड्यावरुन एक फेसाळणारा धबधबा कोसळताना दिसतो. हे दृश्य डोळ्यात साठवत धबधब्याजवळ गेल्यावर येथे एक कुटुंब वास्तव्यास आहे. हे लक्षात येते. हे कुटुंब आपल्या जनावरांसह येथे अनेक वर्षांपासून निवासास आहे. डोंगरात खोल असलेली ही गुहा संरक्षणच्या दृष्टीने आतल्या बाजूने बंद केलेली आहे. येथे जनावरांसह राहणाऱ्या या कुटुंबाला पाण्यासाठी मात्र डोंगरावरच्या कड्यावर जावे लागते. तेथून दोरीला हंडा बांधून खाली गुहे जवळ सोडावा लागतो. मे महिन्याच्या काळात साधारणतः महिनाभर मात्र या कुटुंबाला ही गुहा सोडून गावात यावे लागते. कारण यावेळी येथे पाण्याचा तुटवडा जाणवतो.
घनचक्कर डोंगरावर मुक्कामाला जायचे असल्यास ही गुहा हा एक उत्तम पर्याय आहे. येथे पूर्वकल्पना दिल्यास जेवणाची व्यवस्था ही होऊ शकते. या डोंगर कपारीत अशा तीन मोठ्या नैसर्गिक गुहा आहेत. त्यातील दोन गुहेत जनावरांसह स्थानिक निवास करतात. यांच्या मदतीने पर्यटकांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था होऊ शकते. गुहेपासूनपुढे गड वाटेने गेल्यास आपण सह्याद्रीच्या या उंच शिखरावर पोहोचतो. शिखरावरच्या भव्यमाथ्यावरून आपल्याला सह्याद्रीचे सौंदर्य न्याहाळता येते. भ्रमंती करताना शिखरावरील धार्मिक ठिकाणे, कोरीव काम, पुरातन अवशेष या गोष्टी शोधल्या जातात. मात्र या कोणत्याच गोष्टी येथे नसल्यामुळे कदाचित हे उंच शिखर पर्यटकांच्या नजरेपासून दुर्लक्षित राहिले असावे. मात्र या शिखरावर पोहोचल्यावर या कुठल्याच गोष्टीची उणीव घासत नाही. कारण या शिखरावरून आजूबाजूच्या विस्तीर्ण सह्याद्रीचे दर्शन होते. मात्र तरीही या गडाला घनचक्कर नाव का दिले असावे? हे अनुत्तरीतच राहते.
महाराष्ट्रातील शेजारी शेजारी असलेली तीन व चार नंबरची शिखरे बघणे म्हणजे एक दुग्धशर्करा योगाच आहे. प्राकृतिक सौंदर्य काय असते याचे हे उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. घनचक्कर डोंगरावरून खाली उतरत आपण खिंडीत पोहोचतो. या खिंडीनेच सह्याद्रीतील या दोन उंच शिखरांना जोडण्याची काम केले आहे. या खिंडीतून पुढे गवळदेव डोंगराकडे जाता येते. घनचक्कर डोंगरावरुन पाच मिनिटांच्या अंतरावर दिसणारा हा डोंगर, प्रवासात मात्र खूपच लांबचा वाटतो. डोंगर पोटातून जाणारी वाट आपल्याला बराच वेळ डोंगराच्या कुशीतूनच फिरवते. यावेळी मुडा डोंगराकडून आलेली वाट या ठिकाणीच येऊन मिळते. पुढे एक कातळ टप्पा चढून गेल्यावर गवळदेव डोंगराच्या टप्प्यावर आपण पोहोचतो. अजूनही अंतिम टप्पा पुढे असतो. आता मात्र साध्या रानवाटेने वीस- पंचवीस मिनिटांचा प्रवास करत महाराष्ट्राच्या या उंच शिखरावर आपण पोहोचतो. यावेळी गवळदेव शिखरावर पोहोचण्याचे समाधान आपल्या चेहऱ्यावरती जाणवते शिखराच्या माथ्यावर आजूबाजूला जमा केलेल्या दगडाच्या राशींमध्ये गवळदेवाची स्थापना केलेली दिसून येते. सह्याद्रीतील या उंच ठिकाणावरून मुख्य सह्याद्रीतील हरिश्चंद्रगड- रतनगड -कळसुबाई -या डोंगररांगा टेकडीसारख्या दिसतात. भंडारदरा जलाशय तर काटेरी कुंपणाच्या तारी सारखा भासतो.यावरून या डोंगराच्या उंचीची कल्पना येते. पावसाळा व हिवाळ्यात तर या ठिकाणांना भेटी देणे येथील प्राकृतिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी उत्तम ठरते. येथील सोसाट्याचा वारा, डोळ्यासमोर धावणारे ढग, धुक्याचे ठीक -ठिकाणी दिसणारे पुंजके पावसाच्या कोसळणाऱ्या सरी या सर्व गोष्टी डोळ्यात साठवताना व कॅमेरात बंद करताना तारांबळ उडते. गवळदेव व घनचक्कर डोंगरावरून सह्याद्रीच्या या बलाढ्य पर्वतरांगेच्या उंचीची आपल्याला निश्चितपणे कल्पना येते व भ्रमंतीचे समाधानही मिळते.
स्थानिकांचे श्रद्धास्थान असलेला असा हा दुर्ग भैरवगड.
सह्याद्री डोंगर रांगेतील एक वैभव संपन्न शिरपुंजेगड
लेखन : श्री. अरविंद सुभाष सगभोर ( M.A.History )
संपर्क : 7218663377
ई-मेल : arvind@bhatkya.in