अकोले शहरालगत प्रवरा नदीकाठी असलेले हे प्राचीन मंदिर. अकोले शहरातील लेंडी चौकातून उत्तरेकडच्या रस्त्याने प्रवरा नदीकडे जाता वेळेस उजवीकडे वळणाऱ्या रस्त्याने २०० मिटर उजव्या बाजूला हे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या पश्चिम दिशेने आपण मंदिर परिसरात प्रवेश करतो.
मंदिर परिसरात दाखल होताच त्याचा मोठा परिसर आणि शिल्पकलेच्या कौशल्याची आपल्याला नकळतपणे जाणीव होते. मंदिराला छेडछाड न करता तसेच जतन केलेले आहे. पूर्व-पश्चिम दिशा असलेल्या या प्राचीन मंदिरात पूर्वेकडून प्रवेश केला जातो. मंदिराच्या समोरील नंदी मंडप व गर्भगृह आपल्याला पाहता येते. गर्भगृहाच्या मागील भाग सुरक्षेच्या कारणास्तव कुलुप लावून बंद केलेला आहे. पूर्व दिशेला एक अर्धमंडप आहे. पश्चिमेकडील बाजूने अर्धमंडपानंतर एक मुख्य मंडप आहे जो बंदिस्त केलेला आहे. मात्र बंदिस्त मंडपात खिडकीतून डोकावून पाहिल्यास या ठिकाणाचे सुंदर कोरीव काम आपल्याला चकित करून टाकते. सिध्देश्वराचा हा मंडप तत्कालीन शिल्प वैभवाची साक्ष देतो. सिध्देश्वर मंदिराचे वेगळेपण म्हणजे हा विशाल आकाराचा व अतिशय सुंदरकोरीवकाम केलेला मंडप. हा भव्यदिव्य कोरीव दगडी शिल्पांनीयुक्त मंडप चार कोरीव व भरदार खांबांवर पेललेला आहे. उत्खननात छताच्या काही कातळांना तडे गेल्यामुळे या विशाल मंडपाला आधार देण्यासाठी नवीन दगडी खांबांची कल्पकतेने रचना केलेली दिसून येते.खांबांची रचना करताना या प्राचीन शिल्पकलेला अबाधित ठेवलेले आहे. या विशाल मंडपात लहानमोठी तेरा दालने आहेत. या मुख्य मंडपाच्या पश्चिमेला एक भक्कम अर्धमंडप आहे, तर पूर्वेला अंतराळ आहे. याठिकाणी अंतराळाच्या उत्तरेकडील कोनाड्यात गणपतीची मूर्ती आहे व दक्षिणेकडील कोनाडा रिकामा आहे. मंडपासाठी खांबांवरील केलेले कोरीव काम अतिशय सुंदर आहे. चार खांबांवर केलेले कोरीव काम लक्षवेधी आहे. मंदिराचे खांब खालच्या दिशेला चौकोनी आहेत हा खांबांचा पायाचा भाग असल्याने तो जरा रुंद आहे. त्याच्यावरचारही बाजूंनी छोट्या आकारांचे कोरीव मूर्ती काम आढळून येते. खांबाच्या मध्यावरील भाग अष्टकोनी आहे. त्यातही तीन पट्ट्या कोरलेल्या आहेत. या तीन पट्टयापैकी खालील पट्टीवर मूर्ती कोरलेल्या आहेत. मधल्या पट्टीवर युध्द करणारे योध्दे आहेत. शेवटच्या पट्टीवर हंस कोरलेले आहेत. त्यांच्या वरचा भाग थोडा फुगीर गोलाकार आहे. छतासाठी या खांबांच्या वरच्या भागात चौकोनी दगड तुळा आहेत. त्यावर अष्टकोनी आकाराच्या पट्टया बसविलेल्या आहेत. चौकोनी आणि षटकोनाच्यामध्ये कोरीवकाम आढळून येते. षटकोनाच्यावर खांबाच्या टोकावर वर्तुळाकार नक्षीकाम असून त्यात खाली लोंबणारी दगडी फुले आहेत. मुख्य मंडपाच्या गाभाराच्या पश्चिम बाजूला छतावर समुद्र मंथनाचे अप्रतिम कोरीव शिल्प आपले लक्ष वेधून घेते. मुख्य मंडपातील हे खांब अतिशय सुंदर व रेखीव आहेत. गर्भगृहाच्या मागच्या मुख्य मंडपाला उत्तर व दक्षिण या दोन्ही बाजूने दोन अर्धमंडपही जोडलेले आहेत. या अर्धमंडपांना अर्थ भिंती असल्याने येथुन येणारा प्रकाश सभामंडपातील नक्षीदार खांबांवर पडतो. कमानीदार दिसणाऱ्या दोन्ही उपमंडप यामुळे मुख्य मंडप अतिशय मोठा व भव्य वाटतो. दोन्ही उपमंडपांवर शिखरांची योजना केलेली आहे. दोन्ही उपमंडप व मुख्य मंडप या तिनही मंडपांवर एकाच ओळीत उत्तर-दक्षिणेला अशा तीन कळसांची रचना दिसून येते. मुख्य मंडप व गर्भगृह यामध्ये अंतराळ आहे. जो कुलुप लावून बंद केलेले आहे. गर्भगृहात शिवलिंग आहे.
मंदिराच्या अंतर भागाप्रमाणेच बाह्यभाग ही सुंदर दगडी शिल्पांची रचना केलेला दिसून येते. मंदिराची रचना एका ओळीत सुंदर कोरीवकाम केलेले चार खांब व त्यामागे असणारे दोन खांब असलेल्या नंदी मंडपाने होते. नंदी मंडपाच्या खांबांवरील अप्रतिम कोरीवकाम पाहून आपण थक्क होतो. या नंदी मंडपातील कोरीवकाम बघत गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर आपली नजर स्थिर होते. कोरीवकामाच्या विविधतेने नटलेल्या या प्रवेशद्वारावर काही देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. या प्रवेशद्वारातून शिवलिंग असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो.गर्भगृहातून पाठीमागे जाणारा मार्ग बंद केलेला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बंद केलेल्या या मार्गातून पाठीमागे गेल्यास येथे अंतराळ आहे. अंतराळाच्या पाठीमागे विशाल मुख्य मंडप आहे. या मुख्य मंडपाच्या रुबाबात भर टाकण्यासाठी उत्तर- दक्षिण दिशेला दोन कमानीदार उपमंडप आहेत. या मुख्य मंडपाच्या पश्चिमेला पुन्हा अर्धमंडप आहे. अशा या वैशिट्येपूर्ण कोरीवकाम असलेल्या मंदिराच्या बाहेरील दिशेलाही तेवढेच आकर्षक व नजर खिळवून ठेवणारे नक्षीकाम दिसून येते. गर्भगृहाच्या उत्तर व दक्षिण दिशेला तुटलेल्या मोत्यांचे कोष्टके आहेतमंदिराला बाहेरुन गर्भगृह, मुख्य मंडप व दोन उपमंडप यांवर चार कळस दिसून येतात. मात्र पूर्वेकडील नंदी मंडप व पश्चिमेकडील अर्धमंडप यांच्यावरही कळसांची योजना असवी असे वाटते. उपमंडपांच्या अर्ध्या भिंतीवर बाहेरील बाजूंनी सुरसुंदरीच्या वेगवेगळ्या आकर्षक मूर्तीचे कोरीवकाम दिसून येते. उत्तरेकडील बाजूला २५ व दक्षिणेकडील बाजूला २५ अशा एकूण ५० सुरसुंदरींच्या कोरीव शिल्पांची रचना उपमंडपांवर दिसून येते.
मंदिर परिसरात अनेक दगडी शिल्पे दिसून येतात. पश्चिमेकडील असलेल्या एका शिल्पावर शिवलिंगाचा अभिषेक करणारे दृष्य दिसून येते. याच शिल्पावर शिकारीचेही शिल्प कोरलेले आहे. दुसऱ्या शिल्पावर युध्दाचा प्रसंग कोरलेला दिसून येतो. मंदिराच्या बाहेरील बाजूला नंदीच्या शिल्पांबरोबरच शिवलिंगेही दिसून येतात. मुख्य मंदिराच्या पूर्वेकडे उंच चौथऱ्यावरील दुसरे शिवमंदिर दिसून येते. मंदिराच्या दक्षिणेला कालभैरवाचे मंदिर व पश्चिमेला प्राचीन राम मंदिर आहे. हे मंदिर शिल्पही अतिशय देखणे व रुबाबदार आहे. अंतराळ व गर्भगृह या दोन रचनेत विभागलेल्या या मंदिरावर दोन भव्य कळसांची रचना केलेली आहे. पहिला कळस हा दोन टप्प्यांत घुमटाकार आकाराच असून, गर्भगृहाच्या कळसावर सुंदर नक्षीकाम केलेल्या उंच कळसाची रचना केलेली आहे. अंतराळावर असलेल्या कळसाभोवती चारही कोपऱ्यांवर लहान आकारांच्या चार कळसांची रचना केलेली दिसून येते. या गर्भगृहात संगमरवरी मूत्यांची स्थापना केलेली आहे. मंदिर परिसरात दगडी कोरीव नक्षीकाम केलेले शिल्प आढळून येतात.
सुमारे ३५० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले हे मंदिर आजही आपल्या प्राचीन स्थापत्याची भूरळ घालते. उत्खनन करताना मंदिराच्या प्राचीन कलेला कोणतीही हानी पोहचविली नाही. खाजगी मालकीच्या जागेत असलेले हे मंदिर उत्खननानंतर सातव्या पिढीच्या ताब्यात आहे. मदन कृष्णाजी पेटकर यांचे मालकी जागेत असणाऱ्या या प्राचीन मंदिरात योगेश अगस्ती हे पूजापाठाचे धार्मिक कार्य करतात. या प्राचीन मंदिरात श्रावण महिन्यात सलग ३१ दिवस अभिषेक केला जातो. त्यानंतर षष्टीला संपूर्ण अकोले शहरातून पालखी सोहळा काढला जातो. पालखी सोहळ्यानंतर अष्टमीला दही व तांदूळ यांचा शिवलिंगाला अभिषेक केला जातो. काळभैरव जयंतीला या परिसरात हजारो पणत्या लावून दिपोत्सव साजरा केला जातो. यावेळी हा संपूर्ण परिसर मिणमिणत्या पणत्यांनी उजळून निघतो. हनुमान जयंतीला येथे भोजन उत्सव असतो. प्राचीन कला जपत असतानाच येथे भक्तीभावाने अनेक कार्यक्रम घेतले जातात. यामुळे शहरालगत असलेले हे प्राचीन मंदिर नेहमीच गजबजलेले असते.
लेखन : श्री. अरविंद सुभाष सगभोर ( M.A.History )
संपर्क : 7218663377
ई-मेल : arvind@bhatkya.in