सह्याद्रीतील कळसूबाई डोंगररांगेतील समुद्रसपाटीपासून १३९२ मीटर उंचीवरील गिरिदुर्ग. अहमदनगर- नाशिक जिल्हा हद्दीवरील पट्टावाडी जवळील हा ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज यांची संगमनेर जवळील रायतेवाडी येथे झालेल्या शेवटच्या लढाईनंतर १६७९ मध्ये महाराजांनी या गडावर महिन्याभरापेक्षा जास्त विश्राम केला. शिवछत्रपतींच्या वास्तव्याने पावन झालेला, अकोले तालुक्याच्या प्राकृतिक सौंदर्याने नटलेला व एखाद्या पंख पसरलेल्या पक्षाच्या आकाराप्रमाणे भासणारा हा देखणा किल्ला वन अधिकारी बुळे यांच्या मार्गदर्शनाने पाहण्याचे भाग्य मिळाले.
ऐतिहासिक शौर्याच्या पाऊलखुणा जपत कळसुबाई डोंगर रांगेत उभा असलेला हा संपूर्ण किल्ला पहाण्यासाठी तीन तास पुरेसे आहेत. वन व पर्यटन विभागाचे पर्यटन कर भरून गडावर प्रवेश केल्यावर दहा मिनीटिच्या चढाईनंतर समोरच कातळात कोरलेल्या गुहा दिसतात. एका गुहेत लक्ष्मण स्वामी महाराज यांची समाधी आहे. दुसऱ्या टप्प्यावर एक कुलूपबंद गुहा आहे. येथेच पर्यटकांना विश्रांतीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व सावलीसाठी पत्रा शेड आहे. येथून थोडे वरच्या दिशेने गेल्यावर गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हा त्र्यंबक दरवाजा. त्याच्या उजवीकडे कातळ कड्यात असलेला नैसर्गिक बुरुज आहे. येथून डावीकडे गेल्यावर पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची शृंखला आहे. येथेच पुढे अष्टभुजा पट्टाईमातेचे जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. दर्शन घेत मंदिराच्या पाठीमागचा मोठा टप्पा चढल्यावर शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देणारा अंबरखाना पहावयास मिळतो. अंबरमहाला समोर शिवरायांच्या प्रतिकृतीची स्थापना केलेली आहे. अंबरखान्यातील दृश्य व प्रतिमा इतिहासाच्या प्रेरणादायी स्मृतींना उजाळा देतात. अंबरखान्याच्या पाठीमागे एक मोठा हौद आहे. येथे एक शिवलींग कोरलेले आहे. हौदापासून वर गडाच्या पठारावर गेल्यावर पूर्व बाजूला अर्धवट पाणी टाकी दिसतात. या पाणी टाक्यांच्या कडेने जाणाऱ्या गड वाटेने पुढे गेल्यावर गडावरची मोठी गुहा नजरेत येते. गुहेच्या पुढे शिवकालीन धान्य कोठार व कातळात कोरलेली मोठी गुहा आपले लक्ष वेधून घेते. धान्य कोठार बघत पुढे शिवकालीन बारा पाणी टाकी गडाच्या पाणी व्यवस्थापनाची श्रीमंती दाखवितात. या बारा पाणी टक्क्यांच्या खालील बाजूला ही काही पाणी टाकी दिसतात. उजवीकडे असलेल्या डोंगरावर ढासळलेले बुरुज व तटबंदीचे अवशेष आहेत. गडाच्या माथ्याला सोनटेकडी म्हणतात. सोनटेकडीवरून नाशिक जिल्ह्याचा विस्तीर्ण परिसर व कळसुबाई डोंगररांग एका दृष्टिक्षेपात दिसते. पावसाळा व हिवाळ्यातील सोनटेकडीवरून दिसणाऱ्या सह्याद्रीचे प्राकृतिक सौंदर्य डोळे दिपवणारे असते. येथून पुन्हा अंबरखाण्याकडे माघारी यावे व अंबरखाण्याच्या दक्षिणेला जावे. येथे कडेलोट पॉईंट कोकण दरवाजाचे अवशेष आहेत. येथे जवळ शिवकालीन बंधारा आहे. हा संपूर्ण परिसर सहकुटुंब पहावा असा आहे. चढाईसाठी सोपा असलेला हा गिरिदुर्ग अतिशय देखणा असा आहे. येथे जवळच असलेला बितनगड, औंढा किल्ला, राघोजी खिंड, सिन्नर बाजारपेठ व बाडगीची माची यामुळे या गडावर आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्याही पराक्रमाच्या खुणा असाव्यात यात शंका नाही. पट्टावाडी जवळील मध्ययुगीन व आधुनिक इतिहासाची साक्ष देणारा पट्टा किल्ला. शिवछत्रपतींच्या सहवासाने पावन झालेल्या या विश्रामगडवर आज वन व पर्यटन विभागाने संवर्धनासाठी अनेक उपाययोजना केलेल्या दिसून येतात.
लेखन : श्री. अरविंद सुभाष सगभोर ( M.A.History )
संपर्क : 7218663377
ई-मेल : arvind@bhatkya.in